आयपीएल लिलाव: रणजी ट्रॉफी २०१८ विजेत्या विदर्भ संघाचा हिरो रजनीश गुरबानी आज राहिला अनसोल्ड

आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठीचा लिलाव आज सकाळपासून बंगलोर येथे सुरु आहे. या लिलावात आत्तापर्यंत अनेक आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळाले आहेत. असाच एक निर्णय म्हणजे यावर्षीच्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात हिरो ठरलेला विदर्भाचा रजनीश गुरबानी आज अनसोल्ड राहिला.

रजनीश गुरबानी रणजी ट्रॉफीत उपांत्यपूर्व सामन्यात, उपांत्य सामन्यात आणि अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्याने कर्नाटक विरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात एकूण १२ बळी तर दिल्ली विरुद्ध अंतिम सामन्यात ८ बळी घेतले होते. तसेच अंतिम सामन्यात त्याने हॅट्रिकही घेतली होती.

त्याला रणजी ट्रॉफी स्पर्धेनंतर मुंबई इंडियन्सने चाचणी घेण्यासाठीही बोलावले होते. मात्र आज तो अनसोल्ड राहिल्याने सर्वांना आश्चर्य वाटले.

रजनीश प्रमाणेच आज विंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल, इशांत शर्मा, लसिथ मलिंगा, मिचेल जॉन्सन असे मोठे खेळाडूही आज आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिले आहेत.