रणजी ट्रॉफी: मुंबई विरुद्ध बडोद्याला ३ गुण

मुंबई। वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या मुंबई विरुद्ध बडोदा संघातील रणजी सामन्यात आज अखेरच्या दिवशी सामना अनिर्णित राहिला. परंतु बडोद्याने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर ३ गुण मिळवले. मुंबईने आज दिवसाखेर ७ बाद २६० धावा केल्या.

मुंबईने कालच्या ४ बाद १०२ धावांपासून खेळायला सुरुवात केली. मुंबईकडून आज सावध खेळ करण्यात आला. काल नाबाद असणारी जोडी अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव यांनी सुरवातीला जपून खेळ केला परंतु ४५ धाव करून अजिंक्य रहाणे बाद झाला.

त्यानंतर सूर्यकुमार आणि सिद्धेश लाड यांनी डाव सांभाळत ७९ धावांची अर्धशतकी भागीदारी रचली परंतु ही भागीदारी तोडण्यात दीपक हुडाला यश आले. त्याने सूर्यकुमारला ४४ धावांवर त्रिफळाचित केले. त्यानंतर मात्र अभिषेक नायरने(८) सिद्धेशची चांगली साथ दिली त्यांनी ५० धावांची भागीदारी रचली.

दिवस संपायला काही वेळ राहिला असताना ९ व्या क्रमांकावर आलेल्या धवल कुलकर्णीने(२*) देखील सिद्धेशला चांगली साथ देत आणखी पडझड होऊ दिली नाही. सिद्धेशने नाबाद ७१ धावा केल्या. त्यामुळे मुंबईला सामना वाचवण्यात यश आले.

बडोद्याकडून स्वप्नील सिंग (५५/२), कार्तिक काकडे(५०/२), अतीत शेठ(६६/१), दीपक हुडा(२०/१)आणि लुकमान मेरीवाला(१९/१) बळी घेतले.
बडोद्याने पहिल्या डावात ९ बाद ५७५ धावांवर डाव घोषित केला होता. तर मुंबईने सर्वबाद १७१ धावा केल्या होत्या.

मुंबईचा हा ५०० वा रणजी सामना होता. ५०० रणजी सामने खेळणारा मुंबई पहिला संघ आहे.

संक्षिप्त धावफलक:
मुंबई पहिला डाव: सर्वबाद १७१ धावा
बडोदा पहिला डाव :९ बाद ५७५ धावा (घोषित)
मुंबई दुसरा डाव: ७ बाद २६० धावा

सामनावीर: स्वप्नील सिंग (१६४ धावा आणि २ बळी)