रणजी ट्रॉफी: सर्व्हिसेसविरुद्ध विदर्भाचा मोठा विजय

नागपूर। विदर्भ विरुद्ध सर्विसेस संघात पार पडलेल्या रणजी सामन्यात आज विदर्भाने १९२ धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच विदर्भ ‘ड’ गटात दुसऱ्या स्थानी आला आहे.

आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा विदर्भ त्यांच्या दुसऱ्या डावात २ बाद १११ धावांवर खेळत होते. त्यांनी सकाळच्या सत्रातच ६ बाद २२३ धावांवर डाव घोषित केला आणि पहिल्या डावाच्या ६८ धावांच्या आघाडीसह सर्विसेस संघाला २९१ धावांचे आव्हान दिले.

या आव्हानाचा पाठलाग करताना सर्विस संघ ९९ धावांवरच सर्वबाद झाला. यात फक्त गहलौत राहुल सिंग(३३) आणि विकास यादव (३०*) सोडले तर एकही फलंदाजाला १० धावांच्यावर मजल मारता आली नाही. विदर्भाकडून दुसऱ्या डावात अक्षय वखरेचे ५ बळी आणि कर्ण शर्माचे ३ बळी यांनी विदर्भाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

तत्पूर्वी विदर्भाकडून दुसऱ्या डावात कर्णधार फैझ फेझल(४६), संजय रामास्वामी (४२) आणि अक्षय कर्णेवार (४८*) यांनी विदर्भाला २२३ धावपर्यंतचा टप्पा गाठून दिला. सर्विसेस संघाकडून दुसऱ्या डावात नितीन तन्वर आणि विकास यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक:
विदर्भ पहिला डाव: सर्वबाद- ३८५
सर्विसेस पहिला डाव: सर्वबाद- ३१७
विदर्भ दुसरा डाव: ६ बाद २२३
सर्विसेस दुसरा डाव: सर्वबाद- ९९