अफगाणिस्तानच्या रशीद खानचा गोलंदाजीमध्ये भीमपराक्रम…

क्रिकेटविश्वात गेल्या २ महिन्यापासून एका गोलंदाजाच्या  जोरदार चर्चा आहे तो म्हणजे अफगाणिस्तानचा रशीद खान. आयपीएल मधील आपल्या गोलंदाजीवर भल्याभल्या फलंदाजांना नाचवणाऱ्या ह्या गोलंदाजाने काल एक भीमपराक्रम केला. वेस्ट इंडिज संघाविरुद्ध ग्रोस इसलेत येथे खेळताना त्याने ८.४ षटकात १८ धावा देत ७ बळी घेतले.

यापूर्वी एकदिवसीय सामन्यात एका डावात सार्वधिक बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या चामिंडा वासच्या नावावर असून त्याने २००१ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना ८ षटकांत १९ धावा देत ८ बळी घेतले होते. एकदिवसीय सामन्यात डावात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रशीद ४था असून त्याआधी चामिंडा वास (८/१८), शाहिद आफ्रिदी (७/१२) आणि ग्लेन मॅकग्राथ (७/१५) हे महान खेळाडू आहेत.

विशेष म्हणजे राशिदला काल कर्णधाराने ६ व्या गोलंदाजाच्या रूपात उशिरा चेंडू हातात सोपवला होता. २१व्या षटकात गोलंदाजीला आलेल्या राशीदने ४४.४ व्या षटकात कमिन्सचा बळी घेऊन विंडीज संघाचा डाव संपवला.

आयपीएल २०१७ मध्ये हैद्राबाद संघाकडून खेळताना या गुणी खेळाडूने जोरदार कामगिरी केली होती. आयपीएलमध्ये अफगाणिस्तान संघातून खेळणारा तो दुसरा खेळाडू होता. रशीद वयाने फक्त १८ आणि २६३ दिवसांचा असून अतिशय कमी वयात त्याने ही मोठी कामगिरी केली आहे.