भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री ठरले ‘महाराष्ट्राचा अभिमान’

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ‘महाराष्ट्राचा अभिमान’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांना  ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर 2018 ‘ या पुरस्कार सोहळ्यात देण्यात आला. 

हे या पुरस्काराचे पाचवे पर्व असून त्यांना हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आला. 

ते भारतीय संघाचे कर्णधार, एक अष्टपैलू खेळाडू, संघ व्यवस्थापक राहिले आहेत. तसेच एक उच्च कोटीचे समालोचक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सध्या ते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. 

रवी शास्त्री यांनी भारताकडून ८० कसोटी सामने आणि १५० वनडेत सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी कसोटीत ३८३० धावा आणि १५१ विकेट्स घेतल्या आहेत तर वनडेत ३१०८ धावा आणि १२९ विकेट्स त्यांनी मिळवल्या आहेत. 

हा पुरस्कार सोहळा सध्या मुंबईमध्ये सुरू आहे.