स्पॅनिश सुपर कप माद्रिद ३-१ ने आघाडीवर

स्पॅनिश सुपर कपचा बार्सेलोना आणि रिआल माद्रिद यांच्यातील पहिल्या लेगचा सामना पार पडला. या सामन्यात माद्रिदने ३-१ अशी बाजी मारली. माद्रिदकडून रोनाल्डो आणि इंसेन्सिओ यांनी गोल केले तर बार्सेलोना कडून लिओनेल मेस्सीने गोल केला.

पहिल्या सत्रात दोन्ही संघाकडून धसमुसळा खेळ केला. त्यामुळे पहिल्या सत्रात खूप फाऊल झाले. बेलने २५ व्या मिनिटाला मेस्सीवर फाऊल केला त्यामुळे बार्सेलोना संघाला फ्री किक मिळाली. याचा फायदा उठवण्यात मेस्सी अपयशी ठरला. त्याने मारलेली फ्री किक गोल पोस्टच्या थोडी वरून गेली. पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करण्याच्या जास्त संधी निर्माण करण्यात अपयश आले. त्यामुळे पहिल्या सत्रात गोल होऊ शकला नाही.

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला बार्सेलोना संघाचा डिफेंडर जेराड पीके याच्याकडून बॉल डिफ्लेक्ट होऊन गोलपोस्टमध्ये गेला. यामुळे माद्रिद संघाचे गोलचे खाते उघडले गेले. यानंतर बार्सेलोना संघाकडून गोल करण्याचे खूप प्रयन्त चालू झाले. बार्सेलोनाचा संघ माद्रिदच्या बॉक्समध्ये बॉल घेऊन नेण्यात यशस्वी होत होता. याचा फायदा त्यांना झाला आणि ७७ व्या मिनिटाला बार्सेलोना संघाला पेनल्टी मिळाली. या पेनल्टीवर लिओनेल मस्सीने गोल केला आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला.

या गोलच्या नंतर बार्सेलोना संघ थॊडा आक्रमक झाला. पण प्रतिआक्रमणात माद्रिदच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने जेराड पीकेला चुकवून मारलेला चेंडू गोलपोस्टमध्ये गेला . ८० व्या मिनिटाला माद्रिदने सामन्यात २-१ अशी बढत मिळवली. त्यानंतर २ मिनिटांनी बार्सेलोनाच्या ‘डी’ मध्ये डाइव्ह केल्यामुळे रोनाल्डोला दुसरे येलो कार्ड मिळाले. त्यामुळे  रेड कार्ड दाखवण्यात आले. ९० व्या मिनिटाला गोल करत माद्रिदच्या इंसेन्सिओने बढत ३-१ अशी केली.  सामन्यात आणखी गोल होऊ शकला नाही व सामना ३-१ असा संपला.

स्पॅनिश सुपर कपचा पहिला लेग जिंकण्यात माद्रिद संघाला यश आले आहे. तर दुसऱ्या लेगचा सामना माद्रिदच्या मैदानावर होणार आहे.  हा सामना १७ ऑगस्टच्या पहाटे २:३० वाजता सुरु होईल.