रियल मॅड्रिडचा युसीएल मधील जबरदस्त फॉर्म कायम

युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम १६ फेरीतील सामन्यांच्या दुसऱ्या लेगचे सामने सुरु झाले आणि पहिलाच सामना अंतिम १६ चे प्रमुख आकर्षण समजल्या जाणाऱ्या रियल मॅड्रिड विरुद्ध पॅरिस सेंट जर्मनचा होता. पहिल्या लेगमध्ये आपल्या घरच्या मैदानावर खेळताना रियल मॅड्रिडने ३-१ ने आघाडी घेतली होती. पीएसजीसाठी एकमेव सकारात्मक गोष्ट म्हणजे त्यांनी केलेला अवे गोल.

दूसऱ्या लेगचा सामना पीएसजीच्या घरच्या मैदानावर होता पण सामन्याच्या काही दिवस आधीच त्यांना धक्का लागला तो त्यांचा स्टार नेमारच्या दूखापतीने. त्याच्या पायावर झालेल्या शस्त्रक्रियेने तो १ जून पर्यंत फुटबॉल मैदानावर परतणार नाही एवढे तर निश्चित झाले आणि पीएसजीला नेमार शिवायच सामना खेळावा लागणार याची खात्री झाली.

सामन्याच्या पहिल्या मिनिट पासून रियल मॅड्रिडने पीएसजीचा अटॅक थोपवून ठेवला. त्यांनी पीएसजीला पहिला हाफ गोल करण्यापासून वंचित ठेवत सामन्यात पुनरागमनाची संधीच निर्माण करु दिली नाही. पहिल्या हाफमध्ये फक्त तीनदा त्यांना बॉल गोलपोस्टवर मारता आला पण त्याचे गोलमध्ये रुपांतर झाले नाही.

दूसऱ्या हाफची सुरुवात रियल मॅड्रिडने आक्रमक केली आणि त्याचा फरक अवघ्या ६ मिनिटात पहायला मिळाला. पीएसजीचा ताब्यातून बॉल घेत तो ॲसेंसियोने लुकासकडे देत त्याने त्याचा अप्रतिम क्रॉस दिला आणि रोनाल्डोने हेडरने गोल मारत रियल मॅड्रिडला महत्वपूर्ण अवे गोलची आघाडी मिळवून दिली.

या बरोबरच पीएसजीने पहिल्या लेगची अवे गोलची मिळवलेली आघाडी गमावली. ६६ व्या मिनिटाला वरात्तीला सामन्यातील दूसरे पिवळे कार्ड देत मैदानाबाहेर जावे लागले आणि पीएसजीचा संघ १० खेळाडूंचा राहीला.

७१ व्या मिनिटाला कवानीने डॅनी ॲलवस आणि डी मारीयाच्या रचलेल्या चालीचा फायदा उचलत गोल केला आणि एक आशा जागवली. ०९ मिनिटानंतर ८० व्या मिनिटाला पीएसजीच्या चुकीचा रोनाल्डोने फायदा उचलला आणि कॅसेमिरोला गोल असिस्ट करत सामना संपवला.

कालच्या १-२ अश्या विजया नंतर दोन्ही लेग मिळून सामना रियल मॅड्रिडने ५-२ असा जिंकला. तर दूसरा सामना लिवरपुल विरुद्ध पोर्टो हा ०-० ने बरोबरीत राहीला पण पहिल्या लेगच्या विजयाच्या बळावर लिवरपुलने ५-० ने सामना खिशात घातला.

अंतिम ८ मध्ये आपले स्थान निश्चित करायला सर्व संघ उत्सुक आहेत रियल मॅड्रिड आणि लिवरपुलने आपले स्थान निश्चित केले.