आज रिअल माद्रिदचा भिडणार रिअल सोसइदाद संघाशी

ला लिगामध्ये आज रिअल माद्रिदचा सामना रिअल सोसइदाद या संघाशी आहे. रिअल सोसइदाद संघाने नवीन मोसमाची खूप चांगली सुरुवात केली आहे. या मोसमात त्यांनी तीन सामने खेळले असून तिन्ही सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. हा संघ ला लीगमध्ये बार्सेलोना नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी मागील तीन सामन्यात १० गोल केले आहेत तर ४ गोल स्वीकारले आहेत. उत्तम लयीत असल्याने त्यांना या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा आत्मविश्वास असेल. हा संघ घरच्या मैदानावर खेळण्याचा यांना फायदा होऊ शकतो. या संघाचा अटॅक या संघाची ताकद असून ते या सामन्यात त्याच प्रकारचा खेळ करतील.

रिअल माद्रिद संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. मागील तीन सामन्यात या संघाला फक्त एक विजय मिळवता आला आहे. बाकीच्या दोन सामने त्यांनी बरोबरीत राखले आहेत. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत गॅरेथ बेल गोल करण्याच्या अनेक संधी गमावत आहे. त्यामुळे या संघावर अतिरिक्त दबाव वाढतो आहे. त्यातच करीम बेंझेमा जायबंदी असल्याने मागील काही सामान्यांपासून खेळू शकला नाही. मिडफिल्डर मार्सेलोला ला लीगमधील मागील सामन्यात रेड कार्ड मिळाले होते. त्यामुळे तो हा सामना खेळणार नाही. या सामन्यात झिनेदीन झिदानला माद्रिद संघासोबत काही नवीन प्रयोग करायला हवे आहेत.

या दोन संघातील मागील पाच सामन्यात रिअल माद्रिदचे पारडे जड आहे. त्यांनी मागील पाचही सामन्यात रिअल सोसइदाद संघाचा पराभव केलेला आहे. रिअल सोसइदाद संघाची सध्याची लय पाहता हा सामना खूप रोमहर्षक होईल. मागील पाच सामन्यात जे घडले ते या सामन्यात घडणार नाही अशी अशा अनेक जाणकार व्यक्त करत आहेत. या सामन्यात रिअल सोसइदाद आक्रमणावर भर देईल. आक्रमणावर भर देताना रिअल माद्रीदच्या प्रतिआक्रमने रोखण्यासाठी त्यांना ठोस रणनीती आखावी लागेल. माद्रिद संघाचे मुख्य खेळाडू इस्को आणि असेन्सिओ यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. इस्को,बेल आणि असेन्सिओ यांनी आपली कामगिरी उंचावली तर माद्रिदचा संघ आरामात हा सामना जिंकेल. जर यांनी कामगिरी सुधारली नाही तर रिअल सोसइदादचा संघ बाजी मारेल.