ह्या ५ कारणामुळे भारतीय संघाचा झाला काल पराभव

गुवाहाटी| काल झालेल्या टी २० सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध ८ विकेट्सने पराभवास सामोरे जावे लागले होते. या सामन्यात ऑस्ट्रलियाचा गोलंदाज जेसन बेर्हेनडॉर्फ याने पहिल्या ४ फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखवत भारतीय फलंदाजीचा कणाच मोडला होता. त्यामुळे भारतीय संघाला सामन्यात डोकंवर करण्याची संधीच ऑस्ट्रेलिया संघाने दिली नाही.

भारताच्या पराभवाची काही कारणे:

१. भारतीय फलंदाजांची खराब कामगिरी:
भारतीय संघाची फलंदाजी सध्या मजबूत फलंदाजी मानली जाते. भारताकडे तळातील फलंदाजसुद्धा चांगली फलंदाजी करू शकतात असेच गेल्या काही सामन्यात दिसून आले आहे. पण काल झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाजी पत्त्यांचा बंगला जसा ढेपाळतो तशी ढेपाळली. त्यामुळे भारताचा डाव ११८ धावांपर्यंतच मर्यादित राहिला.
भारताचा सलामीवीर रोहित शर्माने दोन चौकार मारून चांगली सुरुवात केली होती परंतु त्यानंतर मात्र त्याने त्याची विकेट बहाल केली. त्यात भारतीय कर्णधार विराटही शून्यावर बाद झाला. तर शिखर धवननेही २ धावांवर आपली विकेट दिली. मधल्या फळीतील फलंदाजांनाही जास्त योगदान देता आले नाही.

२. ऑस्ट्रलियाची उत्तम गोलंदाजी:
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी योजनापूर्ण गोलंदाजी करताना भारतीय संघाला ११८ धावातच मर्यादित ठेवले. ऑस्ट्रलियाचा गोलंदाज जेसन बेर्हेनडॉर्फ याने तर भारताच्या पहिल्या चारही फलंदाजांचा बळी घेत भारताची अवस्था ४ बाद २७ धावा अशी केली. त्यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांना संधी दिली नाही. केदार जाधव, हार्दिक पांड्यासारख्या भारताच्या आक्रमक फलंदाजांनाही डोके वर काढू दिले नाही.

३.दवाचे कारण:
कालच्या सामन्यात मैदानावर दव पडणार होते. तरीही काल भारतीय कर्णधार विराट कोहलीने अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहराला संधी न देता २ फिरकी गोलंदाज खेळवले. त्यामुळे मैदानावर दव असल्याने कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या गोलंदाजी आक्रमणाची धार गेली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने यांच्या विरोधात जवळ जवळ १० च्या सरासरीने धावा जमा केल्या.

४. चांगल्या सुरुवातीनंतरही भारतीय गोलंदाजांची खराब कामगिरी:
भारतीय गोलंदाजांनी काल सुरुवात चांगली केली होती. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी ऑस्ट्रेलियाच्या आक्रमक सलामीवीरांना स्वस्तात माघारी पाठवले होते. ऑस्ट्रेलियाची अवस्था २ बाद १३ अशी झाली होती परंतु त्यानंतर भारतीय गोलंदाजांना ती लय राखता न आल्याने ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला बाद करता आले नाही. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी जवळ जवळ ६ च्या सरासरी धावा दिल्या परंतु फिरकी गोलंदाजांनी १० च्या सरासरीने धावा दिल्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी ११९ असे माफक आव्हान सहज पार केले.

५. हेन्रिकेज आणि ट्रेव्हिस हेड यांच्यातील भागीदारी:
ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर स्वस्थात माघारी परतल्यामुळे पुढची जबाबदारी मोझेस हेन्रिकेज आणि ट्रेव्हिस हेड यांच्यावर आली. त्यांनी ही जबाबदारी चोख पार पाडताना १०६ धावांची नाबाद शतकी भागीदारी रचली. हेन्रिकेजने फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी केली. त्याने ४६ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. ट्रेव्हिस हेडनेही त्याला साथ देत ३४ चेंडूत ४८ धावा केल्या. या दोघांमधील नाबाद भागीदारीने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.