श्रीलंका विरुद्ध भारत: हे पाच विक्रम या मालिकेत मोडले जाणार !

श्रीलंका विरुद्ध भारत कसोटी मालिका बुधवारपासून सुरु होणार आहे. गॉलच्या मैदानावर पहिला सामना खेळला जाईल. हा सामना भारताचा विक्रमवीर गोलंदाज आर. अश्विनसाठी विशेष असणार आहे. अश्विन गॉलच्या मैदानावर आपल्या कारकिर्दीतील ५० वा कसोटी सामना खेळणार आहे. या मालिकेत असे आणखी बरेच विक्रम बनतील. या विक्रमांचा महा स्पोर्ट्सने घेतलेला आढावा

१. रंगना हेराथ

श्रीलंकेचा हा फिरकी गोलंदाज, दिनेश चंडिमलच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणार आहे. हेराथने आतापर्यंतच्या ८१ कसोटी सामन्यात ३८४ बळी घेतले आहेत. श्रीलंकेकडून सर्वाधिक बळी घेणारा तो मुरलीधरन नंतरचा दुसरा गोलंदाज आहे. आता या मालिकेत १६ विकेट्स घेऊन आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत ४०० विकेट्स घेण्याची त्याला सुवर्ण संधी आहे. असे करणारा तो जगभरातील १४वा गोलंदाज बनेल.

२. चेतेश्वर पुजारा

भारताचा नवीन मिस्टर डिपेंडेबल मानला जाणारा चेतेश्वर पुजाराला त्याच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत ४००० धावा पूर्ण करण्यासाठी फक्त २०२ धावांची गरज आहे. त्याने आता पर्यंत ४८ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळे आहे आणि मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा त्याचा ५० कसोटी सामना असणार आहे.

३. रवीचंद्रन अश्विन

आपल्या कारकिर्दीतील ५० वा कसोटी सामना अश्विन या मालिकेत खेळणार आहे. अश्विन सध्या आयसीसी कसोटी गोलंदाज क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे. अश्विनला कसोटी कारकिर्दीतमध्ये ३०० विकेट्सचा खास आकडा पार करण्यासाठी फक्त २५ विकेट्स हव्या आहेत. तसेच अश्विन आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्याला कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावा करण्यासाठी १०२ धावांची गरज आहे.

४. विराट कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहलीने ५७ सामन्यात ४४९७ धाव केल्या आहेत. आता त्याला ५००० धावा पूर्ण करण्यासाठी ५०३ धावांची गरज आहे. सध्या जबदस्त फॉर्म मध्ये असलेल्या कोहलीने एकदिवसीय सामन्यांत यापूर्वीच ८००० धावांचा आकडा पार केला आहे.

५. अजिंक्य रहाणे

भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ३७ सामन्यात २५८० धावा केल्या आहेत. आता त्याला ३००० धावांचा आकडा पार करण्यासाठी ४२० धावांची गरज आहे.