जागतीक बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचे निकाल

जागतीक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा वरचष्मा राहिला आहे. भारतीय खेळाडूंनी सर्व एकेरीचे सामने जिंकले आहेत. अजय जयराम, साई प्रणीत, किदांबी श्रीकांत, समीर वर्मा या चारही पुरुष एकेरीच्या खेळाडूंनी सामने जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला. पी.व्ही. सिंधू हिने महिला एकेरीत आपला दुसऱ्या फेरीतील सामना जिंकून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी महिला दुहेरीचा सामना जिंकला. प्रणव चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी यांनी मिश्र दुहेरी सामना जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला.

अजय जयराम याने ऑस्ट्रियाच्या लुका व्रबर याचा २१-१४,२१-१२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिल्या सेटमध्ये अजय ४-० असा आघाडीवर होता. त्यानंतर या सेटमध्ये आपला दबदबा कायम राखत त्याने या सेटमध्ये ११-४अशी आघाडी केली. या सेटमध्ये आपली आघाडी कायम राखत त्याने हा सेट २१-१४ असा आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्ये अजयचा खेळ आणखीनच बहरला आणि हा सेट त्याने २१-१२ असा जिंकत सामना आपल्या नावे केला.

पी.व्ही. सिंधू हीचा सामना चौथ्या मानांकित कोरियाच्या किम ह्यो मिन हिच्याशी झाला. या सामन्यात दोन्ही खेळाडूंकडून मोठ्या रॅलीज खेळल्या गेल्या. पहिल्या सेटमध्ये पी.व्ही. सिंधू ८-० अशी आघाडीवर होती. त्यानंतर सामन्यात तिने विरोधी खेळाडूला परतू दिले नाही. हा सेट २१-१६ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही पी.व्ही. सिंधूने विरोधी खेळाडूला फारशी संधी दिली नाही आणि हा सेट २१-१७ असा जिंकला. हा सामना पी.व्ही. सिंधू हिने २१-१६, २१-१७ असा सरळ सेटमध्ये जिंकला.

साई प्रणीत याचा सामना हॉंगकॉंगच्या वेई नान याच्याशी झाला. हा सामना साई प्रणीतने २१-१८, २१-१७ असा आपल्या नावे केला. मिश्र दुहेरीच्या सामन्यात एन. सिक्की रेड्डी -प्रणव चोप्रा यांनी वाय. कृष्णान आणि पी.सावंत या जोडीचा २१-१२,२१-१९ असा पराभव केला.

महिला दुहेरीच्या सामन्यात अश्विनी पोनप्पा आणि तिची जोडीदार एन. सिक्की रेड्डी यांनी आना चोंग आणि आर अमेलिया या जोडीचा २१-१५,२१-१३ असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये भारतीय महिलांची जोडी ११-७ अशी आघाडीवर होती. त्यानंतर हा सेट त्यांनी २१-१५ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये भारतीय जोडीच्या खेळात जास्त ताळमेळ दिसला आणि हा सेट २१-१३ असा जिंकून हा सामना सरळ सेटमध्ये आपल्या नावे केला.

विशेष बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थरावर ही जोडी प्रथमच एकत्र खेळात होती.