ISL: फॉर्म गवसलेल्या दिल्लीचे जमशेदपूरला कडवे आव्हान

जमशेदपूर: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) जमशेदपूर एफसीची रविवारी येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुलात दिल्ली डायनॅमोजविरुद्ध लढत होत आहे. दिल्लीने आधीच्या सामन्यात बेंगळुरू एफसीला हरविले आहे. त्यामुळे जमशेदपूरसमोर कडवे आव्हान असेल.

 

स्टीव कॉप्पेल यांच्या मार्गदर्शनाखाली जमशेदपूरने पदार्पणात समाधानकारक कामगिरी केली आहे. दहा सामन्यांतून 13 गुण मिळवून हा संघ सातव्या क्रमांकावर आहे. दिल्लीविरुद्ध जिंकल्यास त्यांना पहिल्या चार संघांच्या जवळ जाता येईल.

 

उभय संघांमधील पहिल्या सामन्यात जमशेदपूरची सरशी झाली होती. इझु अझुकाचा गोल दिल्लीत निर्णायक ठरला होता. यावेळी सुद्धा तीन गुण मिळविणे जमशेदपूरसाठी सोपे नसेल.

 

कॉप्पेल यांनी सामनापूर्व पत्रकार परिषदेत सांगितले की, तुमचा खेळ आधीच्या लढतीइतकाच चांगला असतो असे फुटबॉलमध्ये म्हटले जाते. दिल्लीने बेंगळुरूला हरविले आहे. दिल्लीला आक्रमण करायला आवडते. त्यामुळे काही वेळा त्यांचा बचाव कमकुवत झाला आहे, पण मी त्यांच्या शैलीचा मोठा चाहता आहे. त्यांना रोखणे आणि प्रतिआक्रमण रचणे मोठे आव्हान असेल.

 

जमशेदपूरने सुद्धा घरच्या मैदानावर केरळा ब्लास्टर्सला हरविले आहे. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य सुद्धा उंचावले असून विजयी मालिका राखण्यास ते उत्सुक आहेत. आपला संघ प्रतिआक्रमण करेल असे कॉप्पेल यांनी सूचित केले.

 

ते म्हणाले की, दिल्लीचा संघ आगेकूच करण्यावर भर देतो. त्यांच्याकडे काही फार वेगवान खेळाडू आहेत. त्यामुळे आम्ही प्रतीआक्रमणासाठी प्रयत्न करू.

 

जमशेदपूरच्या काही खेळाडूंना दुखापत झाली आहे. ब्राझीलचा मध्यरक्षक त्रिंदादे गोन्साल्वीस पायाच्या दुखापतीमुळे न खेळण्याची शक्यता आहे. याविषयी कॉप्पेल म्हणाले की, त्रिंदादेच्या पायाला गोव्यातील सामन्यात किक लागली. त्याच्याविषयी रविवारी सामन्याच्या दिवशीच निर्णय घेऊ. मेहताब हुसेन तंदुरुस्त आहे.

 

दिल्लीसाठी गेल्या काही सामन्यांत लालियनझुला छांगटे याने अप्रतिम खेळ केला आहे. मिझोरामचा हा तरुण खेळाडू जमशेदपूरविरुद्ध चमकदार कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. बेंगळुरुवरील विजयामुळे दिल्लीला बहुमोल असा आत्मविश्वास गवसला आहे. आयएसएलच्या या टप्यास दिल्लीचे प्रशिक्षक मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांना याहून जास्त अपेक्षा करता आली नसती.

 

त्यांनी सांगितले की, जिंकल्यावर तुमचा आत्मविश्वास उंचावतो आणि माझ्यादृष्टिने हेच सर्वोत्तम ट्रेनिंग असते.

 

प्रतिस्पर्धी संघाविषयी पोर्तुगाल म्हणाले की, ब्लास्टर्सविरुद्ध त्यांचा मागील सामना मला आवडला. त्यांनी चांगला खेळ केला. त्यांचा संघ नक्कीच चांगला आहे. त्यांचे आघाडी फळीतील चार खेळाडू तसेच एक स्ट्रायकर चांगला आहे. त्यांचे दोन वींगर सुद्धा वेगवान आहेत.