१३व्या योनेक्स सनराईज-एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल १२वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत प्रणव रेथीन, रिया सचदेवा यांना दुहेरी मुकुटाची संधी

मुंबई। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 13व्या योनेक्स सनराईज-एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात तामिळनाडूच्या प्रणव रेथीन याने, तर मुलींच्या गटात दिल्लीच्या रिया सचदेवा यांनी दुहेरी गटात विजेतेपद पटकावत एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करून दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. तर दुहेरीत मुलांच्या गटात तामिळनाडूच्या प्रणव रेथीन व महालिंगम कांढवळ यांनी, तर मुलींच्या गटात दिल्लीच्या रिया सचदेवा व समिक्षा दबस यांनी विजेतेपद संपादन केले.

जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात उपांत्य फेरीत मुलांच्या गटात तामिळनाडूच्या अव्वल मानांकित प्रणव रेथीन याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत तिसऱ्या मानांकित आपला राज्य सहकारी महालिंगम कांढवळचा 6-4, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या सामन्यात तेलंगणाच्या चौथ्या मानांकित चैत्र रेड्डीने महाराष्ट्राच्या दुस-या मानांकीत अर्णव पापरकर याचा 6-3, 7-5 असा पराभव पराभव केला. अंतिम फेरीत चैत्र रेड्डीचा सामना अव्वल मानांकित प्रणव रेथीनशी असणार आहे. दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत तामिळनाडूच्या प्रणव रेथीन याने महालिंगम कांढवळच्या साथीत कर्नाटकाच्या रूरीक रजनी व क्रिश त्यागी या जोडीचा 6-0, 6-1 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

मुलींच्या गटात एकेरीत उपांत्य फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित दिल्लीच्या रिया सचदेवा हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत तिसऱ्या मानांकित ओरिसाच्या सोहिनी मोहंतीचा 7-5, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. क्वालिफायर महाराष्ट्राच्या माही खोरे हिने दुसऱ्या मानांकित दिल्लीच्या समिक्षा दबसचा 6-2, 7-5 असा सनसनाटी पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुहेरीत अंतिम फेरीत दिल्लीच्या रिया सचदेवा व समिक्षा दबस या जोडीने महाराष्ट्राच्या नैनीका रेड्डी व तेलंगणाच्या साराथानीया गोगुलमंदाचा 6-3, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे आजीव अध्यक्ष शरद कन्नमवार, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक मनोज वैद्य आणि एआयटीए सुपरवायझर पायल जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

उपांत्य फेरी: 12 वर्षाखालील मुले:

प्रणव रेथीन(तामिळनाडू)(1)वि.वि.महालिंगम कांढवळ(3)(तामिळनाडू) 6-4, 6-3;
चैत्र रेड्डी(4)(तेलंगणा)वि.वि.अर्णव पापरकर(2)(महाराष्ट्र) 6-3, 7-5;

12वर्षाखालील मुली:

रिया सचदेवा(1)(दिल्ली)वि.वि.सोहिनी मोहंती(3)(ओरिसा) 7-5, 6-1;
माही खोरे(महाराष्ट्र) वि.वि.समिक्षा दबस(2)(दिल्ली) 6-2, 7-5;

दुहेरी गट:

अंतिम फेरी: मुले:

प्रणव रेथीन(तामिळनाडू)/ महालिंगम कांढवळ(तामिळनाडू) वि.वि. रूरीक रजनी(कर्नाटक)/क्रिश त्यागी(कर्नाटक) 6-0, 6-1;

मुली:

रिया सचदेवा(दिल्ली)/ समिक्षा दबस(दिल्ली) वि.वि. नैनीका रेड्डी(महाराष्ट्र)/साराथानीया गोगुलमंदा(तेलंगणा) 6-3, 6-1.