यष्टीरक्षक रिषभ पंतने फक्त २ सामन्यात घेतले तब्बल १५ झेल

पर्थ। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 4 बाद 132 धावा केल्या आहेत. तसेच ते 175 धावांनी आघाडीवर आहेत. या सामन्यात भारताचा पहिला डाव 283 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे आॅस्ट्रेलियाने 43 धावांची आघाडी घेतली होती.

या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने यष्टीमागे 4 झेल घेताना एक खास विक्रम केला आहे. रिषभने या आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत आत्तापर्यंत 15 झेल घेतले आहेत. त्यामुळे तो आॅस्ट्रेलिया विरुद्ध एका कसोटी मालिकेत यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स (यष्टीचीत + झेल) घेणारा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

हा विक्रम करताना त्याने एमएस धोनी, वृद्धिमान साहा आणि सईद किरमानी यांना मागे टाकले आहे. धोनीने आॅस्ट्रेलिया विरुद्ध 2012-13 आणि 2014-15 आशा दोन्ही कसोटी मालिकांमध्ये यष्टीमागे प्रत्येकी 14 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच किरमानी यांनी 1979-80 दरम्यान आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत यष्टीमागे 14 विकेट्स घेतल्या होत्या. तर साहाने 2016-17 च्या मोसमात झालेल्या कसोटी मालिकेत आॅस्ट्रेलिया विरुद्ध यष्टीमागे 14 विकेट्स घेतल्या होत्या.

याबरोबरच परदेश दौऱ्यात एका कसोटी मालिकेत यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय यष्टीरक्षकांच्या यादीतही रिषभ पंत चौथ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर नरेन ताम्हाणे आहेत. त्यांनी 1955 मध्ये पाकिस्तान दौऱ्यात कसोटी मालिकेमध्ये यष्टीमागे 19 विकेट्स घेतल्या होत्या.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर यष्टीमागील 17 विकेटसह एमएस धोनी आहे. धोनीने 2006 च्या विंडीज दौऱ्यातील कसोटी मालिकेत आणि 2014 च्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत यष्टीमागे प्रत्येकी 14 विकेट्स घेतल्या आहेत.

धोनी पाठोपाठ किरण मोरे असून त्यांनी 1986 च्या इंग्लंड दौऱ्यात यष्टीमागे 16 विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत मोरे यांच्या नंतर पंत असून त्याने याचवर्षी आॅगस्टमध्ये इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेतही  यष्टीमागे 15 विकेट घेण्याचा कारनामा केला होता. विशेष म्हणजे त्याच्या या 15 ही विकेट झेलच्या स्वरुपात आल्या होत्या.

इंग्लंडप्रमाणेच पंतने आॅस्ट्रेलिया विरुद्धही दोन सामन्यातच यष्टीमागे 15 झेल घेतले आहेत. त्यामुळे त्याने त्याच्याच इंग्लंडमधील विक्रमाशी बरोबरी केली आहे.

पंतने आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटीत यष्टीमागे 11 झेल घेतले होते. त्याचबरोबर एका कसोटी सामन्यात यष्टीमागे सर्वाधिक झेल घेण्याच्या विश्वविक्रमाची त्याने बरोबरी केली होती.  याआधी अशी कामगिरी एबी डिव्हिलियर्स आणि जॅक रसल यांनी केली होती.

आॅस्ट्रेलिया विरुद्ध एका कसोटी मालिकेत यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारे यष्टीरक्षक-

15 झेल – रिषभ पंत (2018-19)

14 झेल – सईद किरमानी (1979-80)

14 झेल – एमएस धोनी (2012-13)

14 झेल – एमएस धोनी (2014-15)

14 झेल – वृद्धिमान सहा (2016-17)

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..

पीव्ही सिंधूची ऐतिहासिक सुवर्णमय कामगिरी

आॅस्ट्रेलियन भूमीत किंग कोहलीने केला सचिन तेंडुलकर एवढाच मोठा कारनामा

मोठी बातमी – आॅस्ट्रेलियाला मोठा धक्का, सलामीवीर फलंदाज अॅरॉन फिंचला दुखापतीमुळे सोडावे लागले मैदान

‘हे कधी, केव्हा आणि कशासाठी ?’, हरभजनचा सायमंड्सला प्रश्न