ख्रिस गेलचा टी २० मधील विक्रम थोडक्यात वाचला

सईद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत आज रिषभ पंतने ३२ चेंडूंतच शतक झळकावत टी २० क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक केले आहे. या आधी विंडीजच्या ख्रिस गेलने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडून खेळताना २०१३ मध्ये ३० चेंडूत शतक केले होते.

आज झोनल ग्रुपमधील हिमाचल प्रदेश विरुद्ध दिल्ली संघात सामना झाला. या सामन्यात दिल्लीने हिमाचल प्रदेशवर १० विकेट्सने विजय मिळवला. हिमाचल प्रदेशने दिलेल्या १४५ धावांचा पाठलाग करताना दिल्लीने एकही बळी गमावला नाही.

दिल्लीकडून रिषभने ३८ चेंडूत नाबाद ११६ धावा केल्या.त्याच्या या शतकी खेळीत त्याने तब्बल १२ षटकार आणि ८ चौकार ठोकले. त्याच्या या आक्रमक अंदाजामुळे त्याचा सलामीचा साथीदार गौतम गंभीरला आज प्रेक्षकाचीच भूमिका निभवावी लागली. गौतमने ३३ चेंडूत ३० धावांची नाबाद खेळी केली.

रिषभने हे शतक झळकावताना भारताकडून सर्वात जलद शतक करण्याचाही विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. रोहितने काही दिवसांपूर्वीच श्रीलंका विरुद्ध ३५ चेंडूत शतक केले होते.

हिमाचल प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १४४ धावा केल्या होत्या. हिमाचल प्रदेशकडून प्रशांत चोप्रा(३०) आणि निखिल गांगता(४०) यांनी थोड्याफार धावा केल्या. परंतु बाकी फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. दिल्लीकडून प्रदीप सांगवानने २ तर नवदीप सैनी, पवन नेगी, कुलवंत खेरोलिआ,ललित यादव आणि सुबोथ भाटी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.