विजेतेपद आपलंच ! – रिशांक देवाडिगा, कर्णधार महाराष्ट्र कबड्डी

मुंबई । उपांत्यफेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या संघाचा कर्णधार रिशांक देवाडिगाने हे विजेतेपद महाराष्ट्रालाच मिळणार असा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेपाठोपाठ महाराष्ट्राने काल फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.

काल महा स्पोर्ट्सशी बोलताना हा खेळाडूने संघाची एकंदरीत कामगिरी आणि समीकरणे यावर भाष्य केलं. “आमचा संघ हा स्पर्धेतील सर्वात समतोल संघ आहे. बचाव आणि आक्रमण या दोन्ही क्षेत्रात आम्ही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्हाला विजेतेपदाचा विश्वास आहे. ” असे रिशांक म्हणाला.

काल अनुप कुमारच्या हरियाणा विरुद्धच्या सामन्यात हा खेळाडू खेळला नाही. परंतु तुषार पाटील आणि निलेश साळुंखे यांनी चांगला खेळ करत स्पर्धेतील सर्वात अनुभवी संघाला धूळ चारली.

“तुषार चांगला खेळला. त्याने सामना एका वेगळ्याच उंचीवर काल नेउन ठेवला. पुढच्या सामन्यातही त्याच्याकडून अशीच अपेक्षा असेल. ” असे त्याने हरियाणा विरुद्ध जबदस्त कामगिरी करणाऱ्या तुषार पाटीलबद्दल सांगितले.

“माझी आणि गिरीशची दुखापत थोडी जास्त आहे. परंतु आम्ही उपांत्यफेरीत खेळणार आहोत. काल हरियाणा विरुद्ध दुखापतीमुळे संघाबाहेर बसून राहणे वेदना देणारे होते. मला प्रत्येक क्षणाला मैदानात जाऊन कामगिरी करावे असे वाटत होते. पंरतु काल याची गरज इतर खेळाडूंनी जाणवू दिली नाही. ” असे साखळी सामन्यात न खेळलेल्या रिशांकने सांगितले.

आज महाराष्ट्राची उपांत्य फेरीची लढत कर्नाटक संघासोबत आहे.