मुंबई सिटीला हरवून एटीकेने अखेर संपविला विजयाचा दुष्काळ

मुंबई, दिनांक 17 डिसेंबर ः गतविजेत्या एटीकेने हिरो इंडियन सुपर लिगमधील पहिल्या विजयाची प्रतिक्षा अखेर पाचव्या सामन्यात संपुष्टात आणली. मुंबई सिटी एफसीला उत्तरार्धातील एकमेव गोलच्या जोरावर हरवित एटीकेने मोसमात प्रथमच तीन गुण वसूल केले. रॉबीन सिंग याने केला गोल निर्णायक ठरला.
दहा नंबरची जर्सी घालणारा मार्की खेळाडू रॉबी किन सुरवातीपासून नेतृत्वाची धुरा पेलण्यास उपलब्ध होताच एटीकेला फॉर्म गवसला. मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याने विलक्षण चपळाई दाखविली नसती तर एटीकेला यापेक्षा मोठा विजय मिळविता आला असता. दुसरीकडे गोलरक्षक देबजीत मुजुमदार याने सुद्धा एटीकेचा किल्ला अंतिम टप्यात अभेद्य राखला. मुंबईच्या अचीले एमाना, बलवंत सिंग यांनी केलेले जोरदार प्रयत्न देबजीतने अपयशी ठरविले.
एटीकेला याआधी दोन बरोबरी व तेवढेच पराभव पत्करावे लागले होते. पहिल्या विजयासह त्यांचे पाच गुण झाले. एटीकेने शेवटच्या दहाव्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकापर्यंत प्रगती केली. मुंबईला सहा सामन्यांत तिसरा पराभव पत्करावा लागला. सात गुणांसह त्यांचे पाचवे स्थान कायम राहिले.
एटीकेला सामन्यापूर्वी मोठा दिलासा मिळाला. मार्की खेळाडू किन अखेर शंभर टक्के तंदुरुस्त झाला. त्यामुळे स्टार्टींग लाईन-अपमध्ये त्याचा मोसमात प्रथमच समावेश करणे प्रशिक्षक टेडी शेरींगहॅम याना शक्य झाले. आयर्लंडकडून विश्वकरंडक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीमुळे लोकप्रिय झालेल्या या स्ट्रायकरकडून एटीकेला बऱ्याच आशा आहेत, पण स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वीच त्याला डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे मायदेशी परत जाऊन उपचार घ्यावे लागले. पहिले तीन सामने तो खेळू शकला नाही. त्यानंतर चौथ्या सामन्यात चेन्नईयीन एफसीविरुद्ध तो बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरला होता. आज अखेर तो सुरवातीपासून नेतृत्व करण्याइतपत सज्ज झाला.

एटीकेच्या मोहीमेत त्यामुळे जान आली होती. त्याचे चित्र मैदानावर सुरवातीपासूनच दिसू लागले. एटीकेने चाली रचण्याचा धडाका लावला. यात पदार्पण करणाऱ्या रायन टेलरचा पुढाकार होता. नवव्या मिनिटाला सेहनाज सिंगने झिक्यूइन्हाला पाडले. त्यामुळे एटीकेला फ्री-किक मिळाली. त्यावर टेलरने मारलेले चेंडू नेटसमोर गेला. मुंबईचा राफा जॉर्डा याने डोक्याने चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला, पण दिशा चुकल्यामुळे स्वयंगोलचीच शक्यता निर्माण झाली होती. केवळ अमरिंदरच्या दक्षतेमुळे हे संकट टळले.

17व्या मिनिटाला टेलरनेच चाल रचत टॉम थॉर्प याच्यासाठी संधी निर्माण केली. थॉर्पने क्रॉस हेडींग केले, पण अमरिंदरने डावीकडे झेप टाकत चेंडू अडविला. एटीकेच्या चढाया आणि अमरिंदरचा बचाव असे चित्र 38व्या मिनिटाला पुन्हा दिसले. झिक्यूइन्हाने डावीकडून घोडदौड केली. त्याच्या वेगाला मुंबईचे बचावपटू प्रत्यूत्तर देऊ शकले नाहीत. ही चाल सुद्धा अमरिंदरनेच फोल ठरविली.
किनचा सामन्यातील सहभाग एटीकेसाठी प्रेरणादीय ठरला. 54व्या मिनिटाला किनने नेटसमोरून चाल रचली. त्याने डाव्या बाजूला असलेल्या झिक्युइन्हाला क्रॉस पास दिला. झिक्यूइन्हाने उजव्या पायाने नेटच्या दिशेने फटका मारला. चेंडू अमरिंदरच्या दिशेने जात होता, त्याचवेळी रॉबीनने चपळाई दाखवली. त्याने कंबरेवर सरकत पाय पुढे नेत चेंडूला हलकासा स्पर्श केला. त्यावेळी अमरिंदर चकणे अटळ ठरले.
पुर्वार्धात गोलशून्य बरोबरी झाली. यात अमरिंदरची चपळाई वैशिष्ट्य ठरले. त्यानेच यजमान संघाला तारले. या सत्रात एटीकेने चेंडूवरील ताब्यात 56-44 असे वर्चस्व राखले होते.
उत्तरार्धात दोन्ही संघ खाते उघडण्यासाठी सर्वस्व पणास लावणे अपेक्षित होते.  या शर्यतीत अथक चाली रचत मुंबईच्या क्षेत्रात धडका मारणाऱ्या एटीकेची सरशी झाली. नंतर मुंबईने बरेच प्रयत्न केले. 67व्या मिनिटाला मुंबईला चांगली संधी मिळाली होती. एव्हर्टन सँटोसने क्रॉस पास देत बलवंत सिंगसाठी संधी निर्माण केली. बलवंतने हेडिंग केले, पण एटीकेचा गोलरक्षक देबजीत मुजुमदार याला चेंडू केवळ थोपविता आला, मुंबईच्या खेळाडूंनी रिबाऊंडवर प्रयत्न केले, पण एटीकेच्या बचावपटूंनी धोका टाळला. भरपाई वेळेत एमानाचे झुंजार प्रयत्न गोलमध्ये रुपांतरीत होऊ शकले नाहीत.
निकाल ः
मुंबई सिटी एफसी ः 0 पराभूत विरुद्ध एटीके ः 1 (रॉबिन सिंग 54)