Australian Open 2018: गतविजेता रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत

मेलबर्न। ऑस्ट्रेलियन ओपन २०१८ स्पर्धेत टेनिस स्टार रॉजर फेडररने पहिल्या फेरीत विजय मिळवला आहे. त्याने स्लोवेनियनच्या अल्जैज बेडेनेचा ६-३,६-४,६-३ अशा फरकाने सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सहज प्रवेश केला.

दुसरे मानांकन असणाऱ्या फेडररने बेडेनेला १ तास २९ मिनिटे चाललेल्या लढतीत जिंकण्याची कोणतीही संधी दिली नाही. जागतिक क्रमवारीत ५१ व्या क्रमांकावर असणाऱ्या बेडेने आणि फेडररमध्ये आजपर्यंत एकही लढत झाली नव्हती.

या विजयाबद्दल फेडरर म्हणाला, ” हे आणखी एक चांगले वर्ष असेल अशी मी अशा करतो.” फेडररने मागील वर्षीचा ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डनचा विजेता आहे. त्याच्यासाठी २०१७ हे वर्ष यशस्वी ठरले होते. मागील वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत अंतिम सामन्यात फेडररने राफेल नदालला पराभूत केले होते.

फेडरर पुढे म्हणाला, “मला खात्री नाही की यावेळेलाही तसेच होईल कारण माझे वय एक वर्षांनी आणखी वाढले आहे. राफेल चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि बाकी खेळाडूही पुनरागमन करत आहेत.”

फेडररचा दुसऱ्या फेरीतील सामना जर्मनीच्या जॉन-लेनार्ड स्टर्फशी होणार आहे.