एटीपी फायनल्स: रॉजर फेडररची विजयी सलामी

काल पासून सुरु झालेल्या एटीपी वर्ल्ड टूर फायनलमध्ये टेनिस स्टार रॉजर फेडररने विजयी सलामी दिली. त्याचा कालचा सामना अमेरिकेच्या जॅक सोकशी झाला.

१ तास ३१ मिनिटे चाललेल्या या सामन्यात फेडररने ८व्या मानांकित सोकवर ६-४,७-६ असा सरळ सेटमध्ये सहज विजय मिळवला. दुसऱ्या सेटमध्ये सोकने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला होता परंतु फेडररने त्याच्या अनुभवाच्या जोरावर हा सेट जिंकून सामनाही जिंकला.

आठवड्यापूर्वीच सोकने पॅरिस मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे तो या स्पर्धेत आत्मविश्वासाने उतरला होता परंतु त्याला फेडरेरच्या अनुभवाला मात देता आली नाही.

दुसऱ्या मानांकित फेडररचा हा या वर्षातील ५० वा विजय आहे. तसेच एटीपी क्रमवारीतील टॉप १० खेळाडूंवरील फेडेरेरचा हा १२ वा विजय आहे.यावर्षी फेडररने विम्बल्डन ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम जिंकले आहेत.