रॉजर फेडरर आणि नदाल २०१९ला महाराष्ट्र ओपनमध्ये खेळण्याची शक्यता

0 450

पुणे। येथे पुढच्या महिन्यात महाराष्ट्र ओपन स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेत मारिन चिलीच, केविन अँडरसन यांसारखे मोठे खेळाडू या वर्षी खेळणार आहेत. तर पुढील वर्षी रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे स्टार खेळाडूही या स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता आहे.

याबद्दल या स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार म्हणाले, “यावर्षी आमच्याकडे मारिन चिलीच, केविन अँडरसन आणि टॉमी रोब्रेडो यांसारखे स्टार खेळाडू खेळणार आहेत. यामुळे या स्पर्धेचा उच्च स्थर दिसून येतो. मला जी माहिती आहे त्याप्रमाणे फेडरर आणि नदाल २०१८ मध्ये ब्रिस्बेन ओपनसाठी करारबद्ध आहेत. पण त्यानंतर आम्ही त्यांना या स्पर्धेत आणण्याचा प्रयन्त करणार आहोत”

ही स्पर्धा या आधी चेन्नई ओपन म्हणून ओळखली जात होती. पण नंतर ती पुण्यात हलवण्यात आल्याने तिला महाराष्ट्र ओपन असे नाव देण्यात आले. ही स्पर्धा दक्षिण आशियामधील एकमेव एटीपी २५० टूर्नामेंट आहे.

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे सचिव सुंदर अय्यर म्हणाले, ” चेन्नई हे वेगळे आहे आणि पुणे वेगळे. हे असे आहे की लहान मुलाने मोठे व्हावे आणि त्याच्या प्रगतीसाठी त्याने दुसरीकडे जावे. चेन्नई ओपनसाठी खूप वेळ आणि पैसे गुंतवले होते. पण आता ही स्पर्धा इथे आणून मोठे पाऊल उचलेले आहे. आम्ही या स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार आहोत. आम्ही वेगवेगळ्या इव्हेंट्सवरही काम करत आहोत.”

“आम्ही चॅलेंजर स्पर्धा, डेव्हिस कप आयोजित केले होते. त्याचबरोबर आम्हाला आयटीएफ कडून पुरस्कारही मिळाला आहे. यामुळे आणखी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्हाला आत्मविश्वास मिळतो.”

स्पर्धा बघायला येणाऱ्या प्रेक्षकांबद्दल विचारले असता अय्यर म्हणाले, “पुणे हे टेनिसप्रेमी आहे. चॅलेंजरसाठी आमच्याकडे २५०० खेळाडू आले होते आणि आता अव्वल खेळाडू इथे खेळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणे अवघड नाही. आम्हाला प्रेक्षकांच्या चांगल्या पाठिंब्याची अपेक्षा आहेत.”

महाराष्ट्र ओपन येत्या १ जानेवारीला सुरु होणार आहे. या स्पर्धेची तिकीटविक्री १६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: