Australian Open 2018: रॉजर फेडररने जिंकले २० वे ग्रँडस्लॅम

मेलबर्न। दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने आज ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम जिंकले आणि सर्वांनी एकाच जयघोष केला ‘चॅम्पियन रॉजर फेडरर’. आज त्याने क्रोएशियाच्या मारिन चिलीचचा पराभव केला आणि कारकिर्दीतील विक्रमी २० वे ग्रँडस्लॅम जिंकले.

चिलीच आणि फेडरेरमध्ये आज ५ सेटची रंगतदार लढत झाली. ३ तास ३ मिनिटे झालेल्या या लढतीत चिलीचने फेडररला चांगली लढत दिली पण अखेर फेडररने अनुभवाच्या जोरावर ६-२,६-७,६-३,३-६,६-१ अशा फरकाने विजय मिळवत सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

फेडररने सुरुवात आक्रमक करताना पहिला सेट फक्त २४ मिनिटातच आपल्या नावावर केला होता. मात्र चिलीचनेही दुसऱ्याच सेटमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. दुसरा सेट ६-६ असा बरोबरीत झाल्यानंतर चिलीचने हा सेट अखेर ७-६ असा जिंकला.

दुसऱ्या सेटनंतर फेडररने पुन्हा उत्तम खेळ करत चिलीचसमोर तगडे आव्हान उभे करत तिसरा सेट ६-३ असा जिंकला आणि सामन्यात आघाडी घेतली. चिलीचनेही चौथ्या सेटमध्ये तो हार मानणार नसल्याचे सांगत चौथा सेट ६-३ ने जिंकून सामन्यात बरोबरी साधली. त्यामुळे सामना पाचाव्या आणि निर्णायक सेटमध्ये गेला.

या निर्णायक सेटमध्ये फेडररने वर्चस्व राखत चिलीचला कोणतीही संधी दिली नाही. त्याने आपला खेळ उंचावत नेऊन अखेर ६-१ असा विजय मिळवत दिमाखात सामना जिंकला. फेडररने मागीलवर्षी विम्बल्डनमध्येही चिलीचला पराभूत केले होते.

या विजयानंतर फेडररला त्याचे आनंदाश्रू अनावर झाले. यावेळी त्याचे कुटुंबही प्रेक्षकांमध्ये हजर होते. ३६ वर्षीय फेडररचे गेल्या १२ महिन्यातील हे तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. तसेच त्याने त्याच्या कारकिर्दीतील विसावे ग्रँडस्लॅम जिंकत पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रमही केला. त्याच्या पाठोपाठ राफेल नदालने १६ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.

फेडररने मागच्या वर्षीही ऑस्ट्रेलियन ओपेनचे आणि विम्बल्डनचे विजेतेपद मिळवले होते.

आजच्या विजयानंतर फेडररने प्रेक्षकांचे आणि त्याच्या टीमचे आभार मानले.