फेडररची पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून माघार !

पॅरिस । रॉजर फेडररने प्रतिष्ठेच्या रोलेक्स पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून माघार घेतली आहे. काल बेसेल येथे स्विस इनडोअर स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्यावर त्याने लगेच ही घोषणा केली. 

रॉजर फेडरर पॅरिस मास्टर स्पर्धेत खेळणार नाही याची घोषणा स्पर्धेच्या आयोजकांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. ट्विटमध्ये असे म्हटले आहे की फेडररने पाठदुखीच्या कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे.

फेडरर म्हणाला, ” मी आपली क्षमा मागतो की मी या स्पर्धेतून माघार घेत आहे. परंतु मला खरंच विश्रांतीची गरज आहे. मी यावर्षी खूप टेनिस खेळले आहे आणि मला जर आणखी टेनिस खेळायचे असेल तर मला माझी शारीरिक क्षमता पाहावी लागेल. “

“२०१६चा मोसम माझ्यासाठी खूप खराब होता. मी अर्धा मोसम खेळलोही नाही. मी त्यातून धडा घेतला आहे. मला पॅरिसच्या प्रेक्षकांसमोर नक्की खेळायला आवडले असते. ही एक चांगली स्पर्धा आणि मला वाटते की मी पुढच्या वर्षी या स्पर्धेत नक्की खेळेल. “

यावर्षीच्या मोसमातील पुरुषांच्या टेनिसमधील केवळ दोन स्पर्धा बाकी आहेत. त्यात आजपासून सुरु होत असलेल्या रोलेक्स पॅरिस मास्टर्स आणि १२ नोव्हेंबरआसुसून सुरु होत असलेल्या एटीपी वर्ल्ड टूर फायनलचा समावेश आहे. 

रोलेक्स पॅरिस मास्टर्स स्पर्धा आणि एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धा जिंकून फेडररला पिट सम्प्रास आणि जिमी कॉनर्सचा विक्रम मोडायची संधी होती. वर्षअखेरीस एटीपी क्रमवारीत अव्वल राहण्याचा विक्रम पिट सम्प्रासने ६ तर जिमी कॉनर्सने ५ वेळा केला आहे. फेडररही ५वेळा वर्षअखेरीस अव्वल स्थानी राहिला आहे. 

फेडररचे एटीपी क्रमवारीत ९००५ गुण असून तो दुसऱ्या स्थानी आहे तर १०४६५ गुणांसह राफेल नदाल अव्वल स्थानी आहे. 

फेडररचा सध्याची वर्षभरातील कामगिरी ही त्याची त्याने एका मोसमात आजपर्यंत केलेल्या कामगिरीतील चौथी चांगली कामगिरी आहे. हा खेळाडू यावर्षी ४९ सामने जिंकला आहे तर ४ पराभूत झाला आहे. त्याची जिंकण्याची टक्केवारी तब्बल ९२.४५% आहे. यापूर्वी त्याने अशी कामगिरी केवळ २००५ (९५.३%), २००६ (९४.८%) आणि २००४ (९२.५%) मध्ये केली होती.  

फेडररने यापूर्वीच यावर्षी घोषित केले आहे की तो प्रत्येक स्पर्धा खेळणार नाही. कारण त्याचे शरीर हे आता पाहिल्यासारखे राहिले नाही. वयामुळे आपण योग्य नियोजन आणि वेळापत्रक ठरवून जास्तीजास्त क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू असे फेडररने यापूर्वीच सांगितले आहे. 

फेडररच्या या सांगण्यात तथ्यही आहे. त्याने यावर्षी काही स्पर्धा जिंकल्यानंतर मोठी विश्रांती घेतली आहे. आणि याचे प्रतिबिंब फेडररच्या जबदस्त कामगिरीतही उतरले आहे. फेडररने यावर्षी त्याच्या वयाला आणि चांगल्या कामगीरी करता येणाऱ्या स्पर्धांमध्येच खेळणे पसंत केले. 

पुढच्या वर्षात नोवाक जोकोविच, स्टॅन वावरिंका, केन निशिकोरी, मिलोस राओनिक सारखे खेळाडू पुन्हा फिट होऊन टेनिस गाजवायला सुरुवात करतील आणि फेडररला यावर्षी सारखीच कामगिरी २०१८ मध्ये करणे नक्की अवघड जाणार आहे. टेनिसची नवीन पिढीही आता चांगली कामगिरी करून लागली आहे. 

त्यामुळेच फेडररने  रोलेक्स पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून माघार घेतल्याने चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे.