एटीपी क्रमवारीत मोठा उलटफेर, जाणून घ्या फेडरर कोणत्या स्थानावर आहे

लंडन । ऑस्ट्रेलियन ओपनच्या समारोपानंतर आज एटीपीने जागतिक क्रमवारी जाहीर केली. यात स्पेनचा राफेल नदाल आणि स्वित्झरलॅन्डचा रॉजर फेडरर हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असून मारिन चिलीचने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

रॉजर फेडरर तब्बल ५ वर्षांनी एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानाच्या एवढ्या जवळ आला आहे. परंतु त्याला ते मिळवायचे असेल तर येत्या काळात स्पर्धांमध्ये भाग घ्यावा लागेल.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदानंतर फेडरर आणि नदाल यांच्यातील फरक केवळ १५५ गुणांचा राहिला आहे. फेडररचे हे २०वे ग्रँडस्लॅम होते. फेडरर ४ ऑक्टोबर २०१२ रोजी एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी होता.

या क्रमवारीत मारिन चिलीचला चांगलाच फायदा झाला आहे. त्याने ६व्या स्थानावरून ३ऱ्या स्थानी झेप घेतली आहे. नोवाक जोकोविचलाही एका स्थानाचा फायदा होऊन तो १३व्या स्थानी आला आहे.

काईल एडमंडला २३ स्थानांचा फायदा होऊन तो २३व्या तर ह्योन्ग चुंगला २९ स्थानांचा फायदा होऊन तो २९व्या स्थानी पोहचला आहे.

युकी भाम्बरी १११व्या स्थानी
भारताचा स्टार टेनिसपटू युकी भाम्बरीलाही ऑस्ट्रेलियन ओपनमधील चांगल्या कामगिरीचा फ़ायदा होऊन तो ११९ वरून १११ व्या स्थानावर पोहचला आहे. रामकुमार रामनाथन १४१ वरून १४०व्या स्थानावर आला आहे.