विराट रोहितला म्हणतोय; वनडेत २०० धावा कशा करतात तेवढं सांग

मुंबई । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली गेल्या आठवड्यात बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर विवाहबद्ध झाला. तेव्हा विराट-अनुष्काला अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या होत्या.

त्यात सर्वात जास्त लक्षात राहणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने हटके अशा शुभेच्छा भारताचा तेव्हाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने दिल्या होत्या. तेव्हा विराटला शुभेच्छा देताना अनुष्का-विराटला शुभेच्छा देताना रोहित म्हणाला होता, ” तुम्हाला दोघांना शुभेच्छा. विराट मी तुला एक चांगला पती बनायचं पुस्तक भेट देणार आहे आणि अनुष्का तू तुझं आडनाव बदलू नकोस. “

 

या ट्विटला आज कर्णधार कोहलीने उत्तर दिले. ” धन्यवाद रोहित. एक चांगला पती बनायचं पुस्तक देच पण द्विशतकं कशी करतात याचंही पुस्तक याबरोबर दे. “

काही दिवसांपूर्वीच कर्णधार कोहलीला वनडेत द्विशतकाबद्दल प्रश्न विचारला होता. तेव्हा विराटने आपण ते करू शकतो परंतु रोहितसारखे शांत खेळून शेवटच्या षटकांत एवढी फटकेबाजी करणं अवघड असल्याचं सांगितलं होत. त्यानंतर जेमतेम आठवड्यात रोहितने तिसऱ्यांदा वनडेत द्विशतक ठोकलं होत. चांगली खेळपट्टी आणि अन्य गोष्टी जुळून आल्या तर असं करता येऊ शकत असंही विराट पुढे म्हणाला होता.

आजपर्यंत वनडेत सलामीवीर सोडून कोणत्याही खेळाडूला द्विशतक करता आले नाही. विराट कोहली दोनवेळा द्विशतकाजवळ पोहचला होता परंतु त्यालाही हा कारनामा अजूनतरी करता आला नाही. त्यामुळे येत्या काळात विराट वनडेत अशी कामगिरी करणारा सलामीवीर सोडून जगातील पहिला खेळाडू बनतो का हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.