तिसरा वनडे: न्यूझीलंड विरुद्ध रोहित शर्माची शतकी खेळी

कानपुर। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय सलामीवीर रोहित शर्माने दमदार शतक साजरे केले. त्याने १०६ चेंडूत १०० धावा केल्या. रोहितचे हे वनडेतील १५ वे शतक आहे.

त्याचबरोबर रोहितने या वर्षात वनडेत १००० धावा पूर्ण केल्या. याआधी विराटने ही कामगिरी केली आहे. विराटच्या वनडेतील या वर्षात १३८६* धावा आहेत. रोहित हा विराटनंतर दुसराच भारतीय फलंदाज आहे ज्याने वनडेत या वर्षी १००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

रोहित शर्माने आत्तापर्यंत वनडेत १५० षटकार मारले आहेत. असे करणारा तो फक्त पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. या आधी सचिन तेंडुलकर (१९५), सौरव गांगुली (१९०), एम एस धोनी (२१३) आणि युवराज सिंग (१५५) यांनी अशी कामगिरी केली आहे.

सध्या भारत १ बाद १८३ धावांवर खेळत आहे. रोहित अजूनही नाबाद आहे त्याला कर्णधार विराट कोहली चांगली साथ देत आहे. विराटचेही अर्धशतक झाले आहे आणि या दोघांचीही शतकी भागीदारी पूर्ण झाली आहे.

या दोघांनी आत्तापर्यंत वनडेत १२ वेळा शतकी भागीदारी केली आहे. भारतासाठी वनडेत सर्वात जास्तवेळा शतकी भागीदारी करण्याच्या यादीत विराट आणि रोहितची जोडी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या यादीत सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर अव्वल आहेत त्यांनी २६ वेळा शतकी भागीदारी केली आहे. तर सचिनने वीरेंद्र सेहवाग बरोबरही १३ वेळा शतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे त्यांची जोडी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.