प्रो कबड्डी: हा खेळाडू आहे अक्षय कुमारचा ‘जबरा फॅन’ !

जबदस्त प्रतिभा असणारा बेंगलुरू बुल्सचा कर्णधार रोहित कुमार काल तेलगू टायटन्स संघाविरुद्ध ‘अक्की’ असं पाठीमागे नाव असलेली जर्सी घालून मैदानात उतरला, त्यामुळे या खेळाडूची पुन्हा जोरदार चर्चा सुरु झाली.

२७ वर्षीय रोहित कुमार हा बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा मोठा चाहता आहे. त्याने वेळोवेळी अक्षय कुमारबद्दल असलेलं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. या मोसमाच्या उदघाटन सोहळ्यात रोहितने अक्षयची खास भेट घेतली होती. रोहितच्या डाव्या हाताच्या दंडावर अक्षय कुमारचे चित्र गोंदलेले आहे. तसेच मानेवर अक्की असेही लिहिलेले आहे.

काल जेव्हा हा खेळाडू रेडसाठी मैदानात आला तेव्हा त्याने घातलेली अक्की नावाची जर्सी पाहून सर्वच चाहते आवाक झाले. या प्रतिभावान खेळाडूने काल विक्रमी २०५ गुण हे फक्त रेड मधून मिळवले आहेत. २७ सामन्यात या खेळाडूने तब्बल २२१ गुण मिळवताना फक्त १६ गुण हे टॅकलच्या माध्यमातून घेतले आहेत.