शतक झालं तरीही या कारणामुळे रोहित होता शांत !

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला मागील काही सामन्यांच्या अपयशानंतर अखेर फॉर्म सापडला. त्याने काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११५ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळे काल भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७३ धावांची विजय मिळवून वनडे मालिकेत विजयी आघाडी घेतली. रोहितची ही १७ वे आंतराष्ट्रीय वनडे शतक होते.

काल सामना संपल्यानंतर रोहित पत्रकार परिषदेत बोलत होता. या दरम्यान त्याने त्याचे शतक साजरे न करण्याचे कारण सांगितले. तो म्हणाला, ” माझ्याआधी दोन खेळाडू धावबाद झाले होते. त्यामुळे साजरे करण्यासारखे काही नव्हते. हे तुमच्या मूडवर अवलंबून असते. आमचे दोन फलंदाज धावबाद झाल्यामुळे मला जबाबदारीने खेळायचे होते त्यामुळे शतक साजरे करण्याचे माझ्या मनात नव्हते.”

रोहित बरोबर फलंदाजी करायला आलेला कर्णधार कोहली आणि अजिंक्य रहाणे काल धावबाद झाले होते.

तसेच काल रोहित बऱ्याच दिवसानंतर फॉर्ममध्ये खेळताना चाहत्यांना बघायला मिळाला. त्याला पहिल्या चारही वनडेत अपयश आले होते. त्यामुळे रोहितवर बरीच टीका झाली. याबद्दल रोहित म्हणला, “मी फक्त तीन सामन्यात बाद झालो. तरीही तुम्ही मी वाईट फॉर्ममध्ये आहे असे कसे म्हणू शकता. तुम्ही खेळाडूला एका सामन्यानंतर लगेच चांगल्या फॉर्ममध्ये आहे असे म्हणता आणि जेव्हा एखादा तीन सामन्यात चांगला खेळला नाही तर त्याचा फॉर्म वाईट असे म्हणता. “

रोहितसाठी याआधीचेही दक्षिण आफ्रिकाचे दौरे अपयशी गेले आहेत. त्याबाद्दलही रोहितने आपली मते मांडली आहेत. रोहित म्हणाला, “२०१३ मध्ये वेगळे होते. मी नुकताच सलामीवीर म्हणून खेळायला सुरुवात केली होती. मी आत्ता जशी फलंदाजी करत आहे त्यात अनेक गोष्टींचा समावेश आहे. २०१३ च्या आधी आणि २०१३ ला जे झाले ते विसरून जा.”

रोहितला काल झालेल्या सामन्यात त्याच्या शतकी खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.