रोहितने सांगितले आपल्या ‘हिटमॅन’ नावामागचे रहस्य

भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माने त्याने ‘ हिटमॅन’ हे टोपण नाव कसे पडले हे सांगितले आहे. रोहितने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत या विषयी भाष्य केले आहे.

रोहित म्हणाला ” हे नाव २०१३ ला मी जेव्हा बंगळुरूला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळत होतो तेव्हा पडले.” रोहितने या सामन्यात वनडे क्रिकेटमधील दुसरे तर स्वतःचे पहिले द्विशतक झळकावले होते. त्याने २०९ धावांची खेळी केली होती.

रोहित पुढे म्हणाला, ” रवी शास्त्री जिथे समालोचन करत होते तिथे काम करणाऱ्यांमध्ये एक पीडी नावाच्या व्यक्तीने सामन्यानंतर ‘तू हिटमॅन सारखा खेळला’ असे म्हटले कारण माझे नाव रो- ‘हित’ आहे. हे तिथे उभे असणाऱ्या शास्त्रींनीं ऐकले आणि समालोचन करताना हे नाव घेतले. मला असे वाटते हे त्यातूनच आले असावे. “

रोहितने नुकतेच श्रीलंका विरुद्ध पार पडलेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वनडे कारकिर्दीतील तिसरे द्विशतक झळकावले होते. असे करणारा तो पहिला खेळाडू बनला होता.

तसेच त्याने भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत श्रीलंका विरुद्धच्या वनडे आणि टी २० मालिकेत भारतीय संघाची धुरा सांभाळली होती.