रोहितच्या २६४ धावांच्या विश्वविक्रमी खेळीला ३ वर्ष पूर्ण

तीन वर्षांपूर्वी याच दिवशी भारताचा हिटमॅन रोहित शर्माने वनडेत विक्रमी २६४ धावांची खेळी केली होती. त्याने कोलकत्तामधील ईडन गार्डनवर श्रीलंका विरुद्ध खेळताना ही खेळी केली होती. या खेळीने त्याने वनडेत वयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा वीरेंद्र सेहेवागचा विंडीज विरुद्ध खेळताना केलेल्या २१९ धावांचा विक्रम मोडला होता.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर रोहितने या निर्णयाचा फायदा घेत १७३ चेंडूत २६४ धावा फाटकावल्या होत्या. त्याच्या या विक्रमी खेळीत त्याने ३३ चौकार आणि ९ षटकार मारले होते. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने ५० षटकात ४०४ धावा केल्या होत्या.

रोहितची ही खेळी अनेक अर्थांनी विक्रमी ठरली होती. त्याने वयक्तिक सर्वोच्च धावसंख्येबरोबरच एका डावात सर्वाधिक बाउंड्रीजचा वीरेंद्र सेहवागचा ३२ बाउंड्रीजचा विक्रमही मोडीत काढला होता. रोहितच्या या खेळीत ४२ बाउंड्रीज होत्या.

त्याचबरोबर त्याने ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडूंचा सामना करण्याचाही विक्रम केला होता. त्याने या खेळीसाठी १७३ चेंडू खेळले होते. त्यातील पहिल्या १०० चेंडूत त्याने शतक साजरे केले होते, नंतरच्या १६४ धावा त्याने फक्त ७३ चेंडूत पूर्ण केल्या होत्या.

तसेच या खेळीने तो वनडेत दोन द्विशतके करणारा पहिलाच खेळाडू बनला होता. या सामन्यात तो डावातील शेवटच्या चेंडूवर बाद झाला होता.

या आधी रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २ नोव्हेंबर २०१३ ला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर त्याचे वनडेतील पहिले द्विशतक झळकावले होते.त्याने त्यावेळी २०९ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने १६ षटकार आणि १२ चौकार मारले होते. तेव्हा तो वनडेत द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर आणि सेहवागनंतरचा तिसरा खेळाडू बनला होता. हे द्विशतकही नोव्हेंबर महिन्यात केल्यामुळे रोहितसाठी हा महिना खास आहे.