रोहित शर्मा आणि एम चिन्नास्वामी स्टेडियम, एक खास नाते

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याचे इडन गार्डन स्टेडियमबरोबर विशेष नाते आहे हे आता जगजाहीर आहे. कारण रोहितने एकदिवसीय सामन्यात केलेल्या नाबाद २६४ धावा असोत किंवा कसोटी पदार्पणात विंडीजविरूद्ध केलेले शतक असो, इडन गार्डन स्टेडियम नेहमीच रोहितच्या बाजुने राहिले.

पण त्याचबरोबर रोहितचे आणखी एका स्टेडियमबरोबर खास नाते आहे आणि ते म्हणजे बेंगलोरचे एम चिन्नास्वामी स्टेडियम. रोहितने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पाहिलं द्विशतक याच मैदानावर केले आहे.

दिनांक २ नोव्हेंबर २०१३; आजही तो दिवस तितकाच चिरतरुण आहे. रोहितच्या २०९ धावा आणि या धावा पूर्ण करण्यासाठी त्याने घेतलेले अवघे १५८ चेंडू. या खेळीमध्ये त्याने मारलेले १२ चौकार व १६ गगनचुंबी षटकार आणि ते ही बलाढ्य अॉस्ट्रेलिया विरूद्ध. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका डावात मारलेले हे सर्वाधिक षटकार आहेत.

रोहितने या मैदानावर २ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने एकात २०९ तर दुसऱ्यात ४४ धावा केल्या आहेत. त्याची या मैदानावरील सरासरी १२६.५० अशी आहे.

सध्या हा खेळाडू जबदस्त फॉर्ममध्ये आहे. उद्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या वनडेतही रोहितकडून मोठ्या अपेक्षा आहेत.