म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच…

लखनऊ। भारत विरुद्ध विंडीज संघात सुरु असलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने नाबाद शतकी खेळी केली. त्याच्या शतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 195 धावांचा डोंगर उभा केला आहे.

रोहितने या सामन्यात 61 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 7 षटकार मारले आहेत. हे रोहितचे आंतरराष्ट्रीय टी20 मधील चौथे शतक आहे.

या शतकामुळे रोहितचे आणि नोव्हेंबर महिन्याचे खास नाते पुन्हा सर्वांसमोर आले आहे. कारण रोहितसाठी नोव्हेंबर महिना अनेक गोष्टींसाठी खास आहे.

असे आहे रोहित आणि नोव्हेंबर महिन्याचे खास नाते:

वनडेतील द्विशतके- रोहितने वनडे क्रिकेटमध्ये एकूण तीन द्विशतके केली आहेत. यातील दोन द्विशतके त्याने नोव्हेंबर महिन्यात केली आहेत. तसेच त्याने त्याचे वनडेतील पहिले द्विशतकही नोव्हेंबर महिन्यातच केले होते.

त्याने 2 नोव्हेंबर 2013 ला आॅस्ट्रेलिया विरुद्ध 208 धावांची खेळी केली होती. त्यानंतर एक वर्षांनी 13 नोव्हेंबर 2014 ला वनडे क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या उभारताना 264 धावांची तूफानी खेळी केली होती.

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण आणि 3 कसोटी शतके – रोहितने 6 नोव्हेंबर 2013 मध्ये विंडीज विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 108 वनडे सामने खेळल्यानंतर 7 वर्षांनी रोहित शर्माला क्रिकेटचा हा प्रकार खेळण्याची संधी मिळाली होती.

या सामन्यात रोहितने पहिल्या डावात 301 चेंडूत 177 धावांची धमाकेदार खेळी करत कसोटीतील पहिले शतक केले होते. त्यानंतर पुढच्याच सामन्यातही रोहितने 111 धावांची खेळी करत सलग दुसरे कसोटी शतक केले.

तसेच त्यानंतर रोहितने 26 नोव्हेंबर 2017 ला श्रीलंके विरुद्ध कसोटीतील तिसरे शतक केले. हे शतक त्याने करताना त्याने नाबाद 102 धावांची खेळी केली होती.

विशेष म्हणजे रोहितने आत्तापर्यंत 25 कसोटी सामने खेळताना 3 शतके केली आहेत आणि ही तीनही शतके नोव्हेंबर महिन्यात केली आहेत.

चौथे आंतरराष्ट्रीय टी20 शतक: रोहितने आज (6 नोव्हेंबर2018) आंतरराष्ट्रीय टी20 मधील चौथे शतक केले आहे. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये चार शतके करणारा जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. तसेत आज तो भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू देखील ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

शतकवीर रोहित शर्माने रचला इतिहास, असा पराक्रम करणारा बनला जगातील पहिलाच खेळाडू

धमाकेदार शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माचे ५ धमाकेदार विक्रम

रोहित शर्माचा टी२०मध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा कारनामा़

दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघात सर्वात मोठा बदल

गौतम गंभीरचा आजपर्यंतचा सर्वात गंभीर निर्णय, सोडले या संघाचे कर्णधारपद