षटकार मारणे सोपे नाही- रोहित शर्मा !

काल भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आपले वनडेतील तिसरे द्विशतक साजरे केले. या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवला.

रोहितने नाबाद २०८ धावा करताना तब्बल १२ षटकार मारले. त्यामुळे त्याची तुलना षटकार मारण्यात माहीर असणाऱ्या ख्रिस गेल, ए बी डिव्हिलियर्स यांच्याशी करण्यात येत आहे.

या षटकारांबद्दल सामना संपल्यावर बोलताना रोहित म्हणाला ” षटकार मारणे हे सोपे नाही. यासाठी खूप मेहनत आणि सराव लागतो. टीव्हीवर क्रिकेट बघताना जेवढे ते सोपे वाटते तसे क्रिकेटमध्ये काही सोपे नाही. मी आज स्कुप शॉट खेळून श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षणाला हाताळण्याचा प्रयत्न होतो. ही माझी क्षमता आहे असे मला वाटते.”

त्याचबरोबर त्याने तो बाकीच्या ताकतवान सिक्स हिटर सारखा नसल्याचे सांगत म्हणाला “मी परिस्थिती आधी जाणून घेतो. त्यामुळे मी आधी काही षटके सांभाळून खेळतो. मी ए बी डिव्हिलियर्स, गेल किंवा धोनीसारखा नाही. माझ्यात त्यांच्याइतकी ताकत नाही. क्षेत्ररक्षण हाताळण्यासाठी मी माझ्या बुद्धीचा वापर करतो. मी माझ्या क्षमतेनुसार खेळ करतो.”