दिलदार रोहित शर्मा, श्रीलंकन चाहत्याला श्रीलंकेत परतण्यासाठी केली मोठी मदत

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने माणुसकी म्हणजे काय हे एका श्रीलंकेच्या चाहत्याला त्याच्या संकटसमयी मदत करून दाखवून दिले आहे. रोहित सध्या विराटच्या गैरहजेरीत संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या मालिकेसाठी श्रीलंकेहून गायन सेनानायका, पूबुडु आणि मोहम्मद नीलम हे तीन चाहते भारतात आले होते. परंतु या दरम्यानच नीलम यांच्या वडिलांची तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना लवकर परत जावं लागणार होते. त्यांचे श्रीलंकेचा भारत दौरा संपल्यानंतर श्रीलंकेला परत जाण्याचे २६ डिसेंबरचे तिकीट आधीच आरक्षित होते. पण त्यांना त्याच तिकिटावर लवकर परत जात येत नव्हते.

याबद्दल भारतीय संघाचा चाहता असणारा सुधीर गौतमने रोहितला माहिती दिली. त्यानंतर लगेचच रोहितने ५ डिसेंबरचे तिकीट नीलम यांना दिले ज्यामुळे नीलम यांना लवकरात लवकर त्यांच्या वडिलांकडे जात येईल.

याविषयी नीलम यांनी सांगितले की ” रोहितने मला संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे तिथे येण्यास सांगितले आणि मला जवळजवळ २० हजारांचे तिकीट दिले.”

पुढे ते म्हणाले, ” माझे वडिलांना आता बरे वाटत आहे. त्यांची शस्त्रक्रिया चांगली झाली. मी जेव्हा माझ्या वडिलांच्या खालावलेल्या तब्येतीविषयी ऐकले होते तेव्हा मी खूप अस्वस्थ झालो होतो. पण रोहितचे मन खूप मोठे आहे. त्याने माझे तिकीट काढून दिले.तो खरंच खुप चांगला माणूस आहे. त्याने मला काही आर्थिक मदत हवी आहे का असेही विचारले. पण मी त्याला नकार दिला. मी त्याचा आभारी आहे.”

नीलम विराटनेही आपल्या वडिलांची विचारपूस केली आहे हे सांगताना म्हणाले, ” जेव्हा विराटला माझ्या वडिलांविषयी कळाले तेव्हा त्याने मला संदेश पाठवून काही मदत हवी आहे का असे विचारले. मी विराटला त्याच्या लग्नासाठी शुभेच्छा देतो. त्यांनी खरंच मला तिकीटासाठी खूप मदत केली आहे. जरी आम्ही कुठूनही त्यांना बघायला आलो असलो तरी”

आज भारत आणि श्रीलंका संघात दुसरा वनडे सामना सुरु आहे. पहिला वनडे सामना श्रीलंकेने जिंकला आहे. त्यामुळे ते ३ सामन्यांच्या या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.