रोहित शर्मा, कुलदीप यादवची टी२० क्रमवारीत मोठी झेप

भारत विरुद्ध विंडीज संघात रविवारी(11 नोव्हेंबर) तिसरा टी20 सामना चेन्नईमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांची टी20 मालिका 3-0 ने जिंकली.

या मालिकेनंतर आज(12 नोव्हेंबर) आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत रोहित शर्मा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल यांची क्रमवारी वधारली आहे.

रोहितने लखनऊला झालेल्या दुसऱ्या सामन्यात 111 धावांची नाबाद शतकी खेळी केली होती. या खेळीमुळे त्याला क्रमवारीत सुधारण्यासाठी मदत झाली आहे. त्याने फलंदाजांच्या टी20 क्रमवारीत 10 क्रमांकावरुन आता 7 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

रोहित बरोबरच फलंदाजांच्या टी20 क्रमवारीत शिखर धवनने 5 स्थानांची प्रगती करत 16 वे स्थान मिळवले आहे. तर रिषभ पंतमे 41 गुणांची कमाई करताना 100 वे स्थान मिळवले आहे. या दोघांनीही तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती.

केएल राहुलची मात्र एका स्थानाने घसरण झाली आहे. तो आता चौथ्या स्थानावर आला आहे. त्यामुळे पहिल्या 10 फलंदाजांमध्ये आता राहुल आणि रोहित हे दोन भारतीय फलंदाज आहेत. तर भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली 15 व्या स्थानावर आहे.

या फलंदाजांच्या क्रमवारीत विंडीजच्या शाय होप आणि शिमरॉन हेटमेयरनेही प्रगती केली आहे. परंतू अजूनही त्यांना पहिल्या 100 फलंदाजांमध्ये स्थान मिळवता आलेले नाही.

टी20 गोलंदाजी क्रमवारीत कुलदीप यादवने 14 स्थानांची झेप घेत 23 वे स्थान मिळवले आहे. तसेच युजवेंद्र चहलने पुन्हा एकदा चौथे स्थान मिळवले आहे. याचबरोबर भुवनेश्वर कुमारने 9 स्थानांची प्रगती करताना 19 वे स्थान तर जसप्रीत बुमराहने 5 स्थानांनी उडी घेत 21 वे स्थान मिळवले आहे.

विंडीजकडून कार्लोस ब्रेथवेटने 4 स्थानांची प्रगती करत तर किमो पॉलने 21 स्थानांची मोठी झेप घेत अनुक्रमे 29 आणि 72 वे स्थान मिळवले आहे.

अष्टपैलू खेळाडूंमध्ये मात्र विंडीजच्या मार्लोन सॅम्यूअल्स आणि ब्रेथवेटची घसरण झाली आहे. सॅम्यूअल्सला 4 स्थानांचा तोटा झाला आहे. तो आता 9 व्या क्रमांकावर आला आहे. तर ब्रेथवेटची 2 क्रमांकांनी घसरण होत तो 21 व्या स्थानी आला आहे.

या अष्टपैलू क्रमवारीत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये एकही भारतीय खेळाडू नाही. या क्रमवारीतील भारताची सर्वोच्च क्रमवारी ही 17 आहे. 17 व्या क्रमांकावर भारताचा सुरेश रैना आहे.

टी20 संघ क्रमवारीत भारतीय संघाने 127 गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. या क्रमवारीत पाकिस्तान  अव्वल क्रमांकावर आहे. त्यांचे 138 गुण आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

रिषभ पंतने २१ व्या वर्षी केला हा मोठा कारनामा; बनला रोहित शर्मा नंतरचा दुसराच खेळाडू

एकही चेंडू न खेळता भारतीय महिलांना मिळाल्या १० धावा, काय आहे कारण?

कर्णधार रोहित शर्मानेही केला विराट कोहली प्रमाणे मोठा पराक्रम

महिला टी२० विश्वचषक: भारतीय महिलांचा पाकिस्तान विरुद्ध शानदार विजय