रोहित शर्माची आई म्हणते, मुलाचा खूप अभिमान वाटतो !

भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माने काल मोहालीत पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात द्विशतक झळकावले. हे त्याचे वनडेतील तिसरे द्विशतक आहे.

या विक्रमाबद्दल रोहितच्या आई पौर्णिमा शर्मा यांना त्याचा अभिमान वाटणे साहजिक आहे. याबाद्दल एएनआयशी बोलताना त्या म्हणाल्या ” आम्हाला खूप आनंद झाला. त्याने द्विशतक केले त्याबद्दल खुप अभिमान वाटत आहे. हे त्याने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी केल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला.”

त्या पुढे म्हणाल्या ” आम्हाला आश्चर्य वाटलं ज्याप्रकारे त्याने पहिले शतक केले मग तो १५० धावांवर पोचला आणि लगेचच त्याने षटकार आणि चौकारांची बरसात करत द्विशतकही साजरे केले. आई म्हणून मला माझ्या मुलाचा अभिमान वाटत आहे आणि त्यापेक्षाही त्याने कर्णधार म्हणून संघासाठी केलेल्या चांगल्या खेळीचा अभिमान वाटत आहे.”

रोहितने काल १५३ चेंडूत नाबाद २०८ धावांची खेळी केली होती. यात त्याने १२ षटकार आणि १३ चौकार मारले होते. वनडेत आत्तापर्यंत झळकलेल्या ७ द्विशतकांपैकी एकट्या रोहितने वनडेत तीन द्विशतक झळकावली आहेत.