- Advertisement -

आयसीसी वनडे क्रमवारी जाहीर, रोहित शर्मा ५व्या स्थानी!

0 279

आज आयसीसीने वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने २ स्थानांची प्रगती करत पाचवे स्थान मिळवले आहे.

रोहितने मोहालीत झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका मधील दुसऱ्या वनडेत नाबाद द्विशतकी खेळी केली होती. त्याचा फायदा त्याला क्रमवारी सुधारण्यात झाला आहे.

याबरोबरच काल तिसऱ्या वनडेत शतकी खेळी करणाऱ्या शिखर धवननेही १४ वे स्थान मिळवले आहे. तसेच त्याला या मालिकेतील मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले होते. या फलंदाजी क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी कायम आहे.

गोलंदाजी क्रमवारीतही भारताच्या गोलंदाजांची क्रमवारी वधारली आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलने २३ स्थानांची प्रगती करत २८ वे स्थान मिळवले आहे. तसेच कुलदीप यादवने कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान मिळवताना १६ स्थानांची प्रगती करून ५६ वे स्थान मिळवले आहे. या दोघांनीही श्रीलंकाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत प्रत्येकी ३ बळी घेतले होते.

हार्दिक पांड्याचीही क्रमवारी १० स्थानांनी वधारली आहे. तो आत्ता ४५ व्या स्थानी आला आहे. त्याच्या बरोबरच श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूजही ४५ व्या स्थानी आहे. त्याने ९ स्थानांनी प्रगती केली आहे. भारताचा जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानी कायम आहे.

संघ क्रमवारीत बदल झालेले नाहीत. भारतीय संघ दुसऱ्या स्थानी कायम आहे. परंतु त्यांनी १ गुण गमावला आहे. दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी कायम आहे. भारताने जर श्रीलंका विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत ३-० असा विजय मिळवला असता तर अव्वल स्थान मिळवण्याची संधी होती, परंतु भारताने ही मालिका २-१ ने जिंकली आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: