“तो दिवस मला आयुष्यभर लक्ष्यात राहील”- रोहित शर्मा

भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत प्रभारी कर्णधार पद भूषवल्यानंतर ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रोहितने संघाची यादी नाणेफेकीदरम्यान घेऊन जात असलेला फोटो ट्विट करून लिहिले आहे की ” तो दिवस मला आयुष्यभर लक्ष्यात राहील. मैदानावर पहिल्यांदाच संघाची यादी घेऊन जातानाच्या भावनांची कोणत्याही गोष्टींबरोबर मोजणी किंवा तुलना होऊ शकत नाही. मला अशा खेळाडूंबरोबर खेळताना अभिमान वाटत आहे ज्यांच्यात अफाट गुणवत्ता आणि क्षमता आहे. या पेक्षा जास्त आनंदी असू शकत नाही.”

रोहितने या मालिकेत पहिल्यांदाच भारताचा कर्णधार म्हणून धुरा सांभाळली होती. पण धरमशालाला झालेल्या या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने रोहितचे कर्णधार म्हणून पदार्पण खराब झाले. या सामन्यात श्रीलंकेने ७ विकेट्सने विजय मिळवला होता.

त्यानंतर मात्र भारतीय संघाने मालिकेत पुनरागमन करत पुढील दोन्हीही सामन्यात विजय मिळवला होता. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मोहालीमध्ये रोहितने विक्रमी द्विशतकी खेळी करताना नाबाद २०८ धावा केल्या होत्या. हे त्याचे वनडेतील तिसरे द्विशतक होते. या सामन्यात भारताने १४१ धावांनी विजय मिळवला होता. तसेच विशाखापट्टणम येथे झालेला तिसरा सामना भारताने ८ विकेट्सने सहज जिंकला होता.

यामुळेच पहिला सामना हरला असला तरी रोहितच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच झालेली ही मालिका भारताने जिंकली होती.

भारताची उद्यापासून श्रीलंकेविरुद्ध ३ सामन्यांची टी २० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतही रोहित शर्माच कर्णधार पद भूषवणार आहे.