…तर रोहित शर्मा करणार मुंबई इंडियन्सच्या संघात टिम पेनचा समावेश

मेलबर्न। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 5 बाद 54 धावा केल्या आहेत. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांवर संपुष्टात आला आहे. भारत 346 धावांनी आघाडीवर आहे.

या सामन्यात दुसऱ्या दिवशी(27 डिसेंबर) कर्णधार टिम पेन आणि भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्मामधील मजेदार संवाद स्टंप माइकमधून ऐकायला मिळाला होता.

पेनने रोहित शर्माला स्लेजिंग करताना म्हटले होते की ‘मी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यावा याबाबत गोंधळलेला असतो. पण जर तू आज षटकार मारला तर मी मुंबईला पाठिंबा देईल.’ पेनच्या या बोलण्याकडे लक्ष न देता रोहित फलंदाजी करत होता.

पेनच्या या स्लेजिंगबद्दल रोहित शर्माने तिसऱ्या दिवशीच्या खेळ सुरु होण्याआधी सांगितले की, ‘मी हे सर्व ऐकत होतो. पण मी तेव्हा फलंदाजी करत असल्याने मी माझ्या फलंदाजीवर लक्षकेंद्रीत केले होते.’

‘पण मी अजिंक्य रहाणेबरोबर चर्चा केली आणि मी मजेने म्हणालो जर पेनने इथे शतक केले तर मी मुंबई इंडियन्समधील माझ्या बॉसला त्याला संघात घेण्यासाठी सांगेल. मला असे वाटते तो मुंबईचा चाहता आहे.’

रोहित हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने तीनवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात रोहित आणि रहाणेने पहिल्या डावात 62 धावांची भागीदारी केली आहे. तसेच रोहितने 114 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे या खेळीत रोहितने एकही षटकार मारलेला नाही. हे त्याचे एकही षटकार न मारता केलेले पहिले अर्धशतक आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

सगळा नशीबाचा खेळ! दोन वर्ष प्रयत्न करुनही कोहलीच्या पदरी निराशाच

तब्बल ३५ वर्षांनी आली टीम इंडियावर एवढी मोठी नामुष्की

१२ वर्षांपूर्वी कुंबळेने केलेला विक्रम बुमराह, शमीकडून मोडीत