भारतीय संघाच्या पराभवांनंतर रोहित, धवनच्या प्रतिक्रिया

काल पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पराभवांनंतर भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आम्ही जिंकलो नसलो तरी संघ पूर्ण स्पर्धा चांगला खेळला असल्याचं दोघांनीही म्हटलं आहे.

रोहित शर्मा अंतिम सामन्यात तिसऱ्याच चेंडूवर बाद झाला. रोहित म्हणतो, ” अपेक्षित निकाल नक्कीच नाही. आम्ही प्रचंड उदास आहोत. परंतु आमची टीम एक चांगली टीम आहे. एक खराब सामना खूप काही बदलू शकत नाही. आम्ही यातून लवकरच बाहेर पडू. ”

तर रोहितचा साथीदार आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सार्वधिक धावा करणारा शिखरही काहीशी अशीच प्रतिक्रिया देतो. तो म्हणतो, ” आमच्यासाठी हा अपेक्षित निकाल नक्कीच नाही. तरीही मला माझ्या टीमवर अभिमान आहे जिने चांगली खेळी केली. तुमच्या पाठिंब्याबद्दल आभार. ”

याच महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असून भारताच्या या स्टार सलामीवीरांपैकी रोहित शर्माला या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना २३ जून रोजी होणार असून भारत या दौऱ्यात ५ एकदिवसीय सामने आणि १ टी२० सामना खेळणार आहे.