रोहितचा पुन्हा एकदा द्विशतकी धमाका

मोहाली। येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माने पुन्हा एकदा द्विशतक केले आहे. हे त्याचे तिसरे वनडे द्विशतक आहे.

त्याने ही द्विशतकी खेळी करताना १५३ चेंडूत नाबाद २०८ धावा केल्या आहेत. यात त्याने १२ षटकार आणि १३ चौकार मारले आहेत. रोहितने त्याचे शतक ११५ चेंडूत पूर्ण केले होते. त्यानंतर त्याने पुढचे शतक फक्त ३६ चेंडूत पूर्ण केले.

रोहितने याबरोबरच आत्तापर्यंत भारतात वनडे क्रिकेटमध्ये ८२ षटकार मारले आहेत. भारतात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत १२० षटकारांसह एम एस धोनी अव्वल क्रमांकावर आहे. रोहितने हा विक्रम करताना आज सचिनचा ७१ षटकारांचा विक्रमला मागे टाकले आहे.

रोहितने याआधीही दोनवेळा द्विशतक केली आहेत. त्याने २ नोव्हेंबर २०१३ ला बंगळुरूला ऑस्ट्रेलिया विरुद्ध २०९ धावांची खेळी केली होती. तर २६४ धावांचा विश्वविक्रम त्याने कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर श्रीलंका विरुद्धच १४ नोव्हेंबर २०१४ ला केला होता.

या द्विशतकासोबतच आजपर्यंत वनडे इतिहासात ३ द्विशतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. कर्णधार म्हणून द्विशतक करणारा रोहित, सेहवागनंतर केवळ २ खेळाडू ठरला आहे.  

भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ३९२ धावा केल्या आहेत.