गेल्या सात टी २० सामन्यातील रोहित शर्माची कामगिरी अतिशय खराब

भारताचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा सध्या त्याच्या फॉर्मशी चांगलाच झगडताना दिसत आहे. त्याला गेल्या अनेक सामन्यात मोठ्या धावा करण्यात अपयश आले आहे.

त्याने मागील सात टी २० सामन्यात मिळून फक्त ८७ धावा केल्या आहेत. सध्या रोहित श्रीलंकेमध्ये निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिका खेळत आहे. या मालिकेत भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थित तो भारतीय संघाची धुरा सांभाळत आहे.

पण त्याला या मालिकेतही मोठ्या धावा करण्यात अपयश आले आहे. त्यात या मालिकेतील पहिल्याच सामन्यात रोहित शून्य धावेवर बाद झाला होता. तसेच भारताकडून सर्वाधिक वेळा आंतराष्ट्रीय टी २० मध्ये शून्यावर बाद होण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे.

विशेष म्हणजे मागील सात टी २० सामन्यांमध्ये रोहित दोन वेळा शून्यावर बाद झाला आहे. आजपर्यंत रोहित त्याच्या टी २० कारकिर्दीत ५ वेळा शून्यावर बाद झाला आहे.

अशी आहे मागील ७ टी २० सामन्यांमधील रोहितची कामगिरी:

२७- श्रीलंका
२१- दक्षिण आफ्रिका
०- दक्षिण आफ्रिका
११- दक्षिण आफ्रिका
०- श्रीलंका
१७- बांग्लादेश
११- श्रीलंका