गेल्या ५ वर्षात रोहित शर्माने मारलेत एवढे षटकार !

कानपुर । भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने गेल्या ५ वर्षात तब्बल १२७ षटकार खेचले आहेत.

१ जानेवारी २०१३ पासून आजपर्यंत रोहित शर्मा ८५ वनडे सामने खेळला असून त्यात सार्वधिक अर्थात १२७ षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो अव्वल आहे. २००७ साली वनडे पदार्पण करणाऱ्या या खेळाडूने २०१३ पूर्वी ८६ सामन्यात केवळ २३ षटकार खेचले होते.

रोहितने २०१३ (२२), २०१४ (२२), २०१५(२३), २०१६(१९) आणि २०१७ (३३) असे षटकार खेचले आहेत.

रोहित पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर एबी डिव्हिलिअर्स असून त्याने २०१३ ते २०१७ या काळात ९३ वनडेत ११४ षटकार खेचले आहेत.

भारतीय संघ व्यवस्थापनाने २०१३मध्ये रोहितला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि तो एक चांगला निर्णय ठरला. या खेळाडूने कारकिर्दीत १५ शतके केली आहेत त्यातील १३ ही २०१३ ते २०१५ या काळात केली आहेत.

विशेष म्हणजे रोहितची दोन्ही द्विशतके ह्याच काळात झाली आहेत. या काळात वनडेत सार्वधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही तो तिसऱ्या स्थानी आहे. त्यापेक्षा केवळ विराट कोहली आणि एबी डिव्हिलिअर्स यांनी जास्त धावा केल्या आहेत.