का झाले रोहितची पत्नी रितिकाला अश्रू अनावर

मोहाली। येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने त्यांचे वनडेतील तिसरे द्विशतक पूर्ण केले. त्याने हे द्विशतक त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी केले असल्याने त्याच्यासाठी हे द्विशतक खास ठरले आहे.

रोहित आणि रितिका यांच्या लग्नाला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत आणि याच दिवशी आज रोहितने द्विशतक करत आपली पत्नी रितिकाला द्विशतकाची खास भेट दिली आहे.

रोहितने जेव्हा शतक केले होते तेव्हा त्याने ते साजरे करताना रितिकाला समर्पित केले असल्याचा इशारा केला होता. तसेच रोहितने जेव्हा द्विशतक पूर्ण केले तेव्हा रितिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.

 

रोहितने १५३ चेंडूत नाबाद २०८ धावा केल्या आहेत. यात त्याने तब्बल १२ षटकार आणि १३ चौकार मारले. वनडेत ३ द्विशतके करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. तसेच वनडेत द्विशतक करणारा वीरेंद्र सेहवाग नंतरचा दुसरा कर्णधार बनला आहे.

तसेच रोहित या वनडे मालिकेत विराट कोहलीने विश्रांती घेतली असल्याने भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. भारताने या सामन्यात ४ बाद ३९२ धावा केल्या आहेत.