उप-कर्णधार पद म्हणजे एक सन्मान: रोहित शर्मा

मागील आठवड्यात श्रीलंका दौऱ्याच्या एकदिवसीय सामन्यासाठीच्या भारतीय संघाची घोषणा झाली. युवराज सिंगला संघात स्थान मिळाले नाही हि तर मोठी बातमी होतीच पण त्याहूनही मोठी बातमी म्हणजे रोहित शर्माला भारतीय एकदिवसीय संघाचा उप-कर्णधार करण्यात आले आहे ही होती.
रोहित आता ३० वर्षाचा आहे जेव्हा त्याने क्रिकेट खेळणे सुरु केले तेव्हा त्याचे ध्येय फक्त भारतासाठी खेळण्याचे होते असे तो म्हणाला. “भारतीय संघाचा उप-कर्णधार होऊन मी खूप आनंदी आहे. हा एक प्रकारचा सन्मान आहे. जेव्हा २० ऑगस्ट रोजी आम्ही पहिला एकदिवसीय सामना खेळायला मैदानात उतरू तेव्हा मला एक विशिष्ट भूमिका निभवावी लागेल आणि मी त्यासाठी उत्सुक आहे. मी याबद्दल खूप विचार करीत नाही, आता मला या क्षणाचा आनंद घ्यावयाचा आहे. ”

आयपीएल मधील कर्णधार पद आणि आंतररराष्ट्रीय एकदिवसीयमधील उप-कर्णधार पद या बद्दल विचारले असता तो म्हणाला, “आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे पूर्णपणे वेगळंच आहे पण उत्साह आणि उर्जेचा स्तर समानच असतो. म्हणूनच खूप काही बदलत नाही. मी येथे उपकर्णधार आहे आणि तिथे कर्णधार होतो, म्हणून माझ्यावर आयपीएलमध्ये जास्त जबाबदारी आहे. इथे मी पडद्या मागे एक छोटीशी भूमिका निभावणार आहे. पण हा, भारतीय संघाचा उप-कर्णधार म्हणून मैदानावर उतरण्यास खूप उत्सुक आहे. ”

रोहित शर्मा भारताकडून १५८ सामने खेळला असून त्याने यात ५४३५ धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या ११ शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे.