भारताचा वेगवान गोलंदाज आरपी सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

भारताचा वेगवान गोलंदाज आरपी सिंगने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून मंगळवारी(4 सप्टेंबर) निवृत्ती घोषित केली आहे.

32 वर्षीय आरपीने 13 वर्षांपूर्वी 4 सप्टेंबर 2005 ला झिम्बाब्वे विरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

त्याने या निवृत्तीच्या निर्णयाची ट्विटरवरुन माहिती दिली. त्याने म्हटले आहे की ’13 वर्षांपूर्वी 4 सप्टेंबर 2005 ला मी पहिल्यांदाच भारताची जर्सी घातली होती. हा असा क्षण होतो जो कायम माझ्या लक्षात राहिल. आज मी निवृत्ती घेत आहे. हा प्रवाश शक्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार.’

‘माझ्या आत भावनांचा गोंधळ सुरु आहे. एखादा या दिवसासाठी कसा तयार होतो. गुडबाय म्हणणे हे कठीण आहे. पण कुठेतरी तुमच्या आतला आवाज तुम्हाला सांगतो की आता वेळ आली आहे.’

‘आणि माझ्यासाठी ती आज आहे. युवा खेळाडू म्हणून फैसलाबाद येथे पाकिस्तान विरुद्ध केलेले कसोटी पदार्पणाच्या वेळी ज्या भावना होत्या, की हातात लेदरचा चेंडू असावा आणि आपण खेळावे. तशा भावना आजही आहेत पण माझे शरीर मला वाढत्या वयाची आठवण करुन देते. ‘

आरपीने भारताकडून 14 कसोटी, 58 वनडे आणि 10 टी20 सामने खेळले आहेत. तसेच त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंड विरुद्ध कार्डीफ येथे 16 सप्टेंबर 2011 ला खेळला आहे. त्याने त्याच्या 13 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 124 विकेट्स घेतल्या आहेत.

2007 हे वर्ष त्याच्यासाठी चांगले ठरले होते. या वर्षी तो प्रकाशझोतात आला. त्याने 2007 मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्यात त्यावेळचा कर्णधार राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या डावात 59 धावात 5 विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याची कसोटी कारकिर्दीतीलही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

त्याच्या कामगिरीने 21 वर्षांनंतर भारताला इंग्लंडमध्ये मालिका जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याचबरोबर 2007 ला झालेल्या पहिल्या टी20 विश्वचषकातही त्याने 7 सामन्यात 12 विकेट घेत भारताकडून या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचाही पराक्रम केला.

त्याचबरोबर 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सला आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या आयपीएलमध्ये 23 फलंदाजांना बाद केले होते. तसेच तो या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही ठरला होता.

आरपीने शेवटचा प्रथम श्रेणी सामना 2017 मध्ये खेळला आहे. हा सामना त्याने गुजरातकडून मुंबई विरुद्ध खेळला. त्याने आत्तापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 94 सामन्यात 301 विकेट्स घेतल्या आहेत.  

त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर देशांतर्गत क्रिकेट खेळणे सुरु ठवले होते. पण आता त्याने सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो सध्या समालोचक म्हणूनही काम करतो.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

वृद्धिमान सहाने ट्विट केलेल्या गमतीशीर फोटोवर स्टीव्ह स्मिथने दिली अशी प्रतिक्रिया…

ला लीगामध्ये मेस्सीने केला एक खास विक्रम…

युएस ओपन: दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला पराभवाचा धक्का