ट्विटरवरची टिव टिव चांगलीच भोवली, केले ३ ट्विट, दंड झाला ३ हजार डॉलर

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज रायन हॅरिसला ट्विटरवरील टिव टिव चांगलीच भोवली आहे. त्याला आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मोठी दंडाची शिक्षा करण्यात आली आहे.

रायन हॅरिसने अॅलेक्स रॉसच्या क्षेत्ररक्षणात अडथळा आणण्याच्या घटनेला धरून ट्विट केले होते. तसेच तिसऱ्या पंचांच्या निर्णयाला लाजीरवाणा आणि धक्कादायक असे संबोधले होते.

१६.५व्या षटकात जेव्हा अॅलेक्स रॉस दुसऱ्या धावेसाठी पळत होता तेव्हा त्याने क्षेत्ररक्षणात अडथळा आणला आणि त्याला बाद देण्यात आले असा निर्णय तिसऱ्या पंचांनी दिला होता.

हॅरिस हा क्रिकेट ऑस्ट्रेलियामधील एक मोठ्या प्रशिक्षक पदावर आहे. परंतु बिग बॅश लीगमधील ब्रिसबेन हिट आणि हॉबर्ट हरिकेन्स सामन्यानंतर केलेल्या ट्विटसाठी त्यावर कारवाई करण्यात आली आहे.

या चुकीसाठी त्याला ३ हजार डॉलरचा दंड करण्यात आला असून पुन्हा अशी चूक झाली तर कायमच्या निलंबनाची कारवाई करण्याची तंबी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे हॅरिसने आपली चूक मान्य केली असून पुढे कोणतीही सुनवाई यासाठी न घेण्याची विनंती केली आहे.