सचिनचा २००वा कसोटी सामना आणि मी…

0 121

१३ नोव्हेंबर २०१३ रोजी मी अंदाजे ३००-४०० कॉल्स वेगवेगळ्या लोकांना केले असतील. तरीही कुठून काही लिंक लागेना. तेव्हा मी पुण्यात एका खाजगी कंपनीमध्ये अभियंता म्हणून नोकरी करत असल्याने ऑफिसमधून विविध लोकांना कॉल्स करण्यात मर्यादा येत होत्या. शेवटी एक जवळच्या नातेवाईकाकडून एक नंबर मिळाला आणि तो म्हणाला त्यांना कॉल करून विचार. ते एका कंपनीमध्ये काम करतात. त्यांच्याकडे असतात मुंबईच्या स्टेडियम होणाऱ्या सामान्यांची तिकिटे. बरेच प्रयत्न केल्यावर रात्री ७ वाजता त्या व्यक्तीला कॉल शेवटी लागला आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला. “तुम्हाला जर तिकीट हवं असेल तर ठाणे स्टेशनला पहाटे ५:३० वाजता यावं लागेल. मी त्यापुढे वाट नाही पाहू शकत आणि हो येताना मी सांगितलेली तेवढी रक्कम घेऊन या. ” पलीकडून ती व्यक्ती फोनवर बोलली.

578556 595929093776147 1694907290 n 300x225 - सचिनचा २००वा कसोटी सामना आणि मी...

 

रात्री ७ नंतर मला दोन गोष्टी करायच्या होत्या. लवकरात लवकर आवरून मुंबईला जाणे आणि त्याने सांगितलेली तिकीटाची रक्कम जमा करणे. शेवटी बराच खटाटोप करून रात्री १२ वाजताची बस पकडून मी ठाणे येथे पोहचलो आणि ठरलेली रक्कम देऊन त्या व्यक्तीकडून तिकीट घेतले. कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात सुरक्षेच्या कारणास्तव बॅग, पाण्याची बाटली, मोबाइल चार्जेर ह्या वस्तू स्टेडियममध्ये नेऊ देत नाही. हे आधी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज आणि भारत विरुद्ध इंग्लंड हे कसोटी सामने वानखेडेवर २०११ आणि २०१२ मध्ये पाहिल्यामुळे मला माहित होते. मी तर पूर्ण ५ दिवसांच्या तयारीने आलो होतो. त्यामुळे मी आणलेलं सामान कुठेतरी ठेवणं क्रमप्राप्त होत. शेवटी मुंबई राहणाऱ्या बहिणीकडे सर्व वस्तू ठेवून मी सेंट्रल रेल्वेमधील गर्दीमध्ये धक्के खात, अगला स्टेशन ऐकत सीएसटीकडे रवाना झालो.

580619 595932033775853 1215859447 n 300x225 - सचिनचा २००वा कसोटी सामना आणि मी...

 

जेव्हा सीएसटीला पोहचलो तेव्हा गौरव नावाच्या मित्राचा फोन आला. “दोन तिकीट होतील का रे मॅनेज कुठून.” पुन्हा त्याच व्यक्तीला कॉल, पुन्हा तोच खटाटोप. शेवटी मिळाले दोन तिकीट. या प्रवासातील सर्वात आनंद देणारा आणि सचिनबद्दल मुंबईकरांना काय वाटत हे सांगणारे असंख्य क्षण आले. जेव्हा ठाणे ते सीएसटी प्रवास करत होतो तेव्हा चुकून तिकीटाचा एक कोपरा वरती आला आणि तो एका प्रवाशाने पहिला. “आप बहोत लकी हो आपको भगवान के रिटायरमेंट मॅच का तिकीट मिला हैं.” असं त्याने म्हणेपर्यंत माझ्या शेजारी १० जण जमा होऊन चौकशी करत होते. कुठून तिकीट मिळालं. आम्हाला मिळेल का. भाऊ तुमचं नशीब भारी आहे. आम्हालाही सचिनचा शेवटचा सामना पाहायचा होता. खूप प्रयत्न करूनही तिकीट मिळालं नाही वगैरे.

1003550 595931983775858 1001393881 n 300x225 - सचिनचा २००वा कसोटी सामना आणि मी...

 

बरोबर १४ नोव्हेंबर २०१३ ला सकाळी ठीक ९:१५ला मी मैदानात पोहचलो असेल. पवार साहेबांच्या हस्ते सचिनच्या तिकिटाच अनावर वानखेडेमध्ये केलं जात होत. भारतीय टपाल तिकीट हे २५, ५०, ७५, १०० असं वय झाल्यावर विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्यावर काढलं जात. सचिनबद्दल थोडे नियम शिथिल करून ते तेव्हाच काढलं गेलं. पुढे सचिनच्या ह्याच तिकिटातून भारतीय टपाल खात्याला चिक्कार पैसा मिळाला तो विषय वेगळा. इंडिजने प्रथम फलंदाजी करून जेमतेम १८२ धावा जमवल्या. भारताच्या गोलंदाजीने पहिल्याच दिवशी इंडिजला बाद केल्यामुळे भारतीय फलंदाजांना पहिल्याच दिवशी मैदानात यावे लागले. अपेक्षेप्रमाणे सलामीच्या फलंदाजी केल्यानंतर २०० व्या कसोटीसाठी विशेष बनवलेली बॅट घेऊन जागतिक क्रिकेटवर तब्बल २४ वर्ष अधिराज्य गाजवलेला क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर १४ नोव्हेंबर रोजी आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटच्या फलंदाजीसाठी मैदानात उतरला. सचिन-सचिन संपूर्ण मैदानात एकाच आवाज. त्यानंतर मास्टर ब्लास्टरने खेळलेल्या प्रत्येक साध्या फटक्यालाही प्रेक्षांकाची जोरदार दाद मिळत होती. बॉलीवूड सेलेब्रिटी आपल्या कामाला टांग देऊन वांद्रयावरून थेट वानखेडेवर हजेरी लावत होते. अगदी नीता अंबानींपासून आमिर खान, ह्रितिक रोशन सगळे वेगवेगळ्या स्टॅन्ड मधून सचिनला पाठिंबा देत होते.

1185603 595932060442517 2053015371 n 300x225 - सचिनचा २००वा कसोटी सामना आणि मी...
‘धोनी, डिक्लर द इंनिंग!” १५ नोव्हेंबर रोजी मैदानात एकच आवाज. जेमतेम १५ कसोटी खेळलेल्या नर्सिंग देवनारायणला क्रिकेटच्या पुस्तकात सचिनने कायमच स्थान मिळवून दिल होत. सचिनला ७४ धावांवर डॅरेन सॅमीच्या हातात झेल देण्यास भाग पाडून नर्सिंग देवनारायण कायमच सचिन चाहत्यांच्या मनात व्हिलन झाला होता. भारताचा डाव ४९५ धावांत दुसऱ्याच दिवशी संपुष्ठात आला. परंतु या धावा जमवताना भारताने एकदिवसीय क्रिकेटला शोभेल अशी ४.५८ च्या सरासरीने फलंदाजी केली होती. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी पुन्हा इंडिजला फलंदाजीला यावे लागले. कमीतकमी दुसऱ्या डावात तरी इंडिज थोड्याफार चांगल्या धावा करून भारताला पुन्हा फलंदाजी करायला लावेल अशी अपेक्षा होती. जेणेकरून सचिन प्रेमींना पुन्हा त्याची फलंदाजी पाहता आली असती. पण चाहत्यांच्या या सर्व अपेक्षांवर इंडिजने पाणी फेरले.

1469781 595931220442601 1192068388 n 300x225 - सचिनचा २००वा कसोटी सामना आणि मी...

 

दिनांक १६ नोव्हेंबर रोजी प्रग्यान ओझाच्या गोलंदाजीवर सकाळी अंदाजे ११ वाजता डॅरेन सॅमी पायचीत झाला. ती इंडिजची ८वी विकेट होती. त्या विकेट बरोबर भारत विजयाच्या समीप जात होता तर चाहते एका मोठ्या नायकाच्या फलंदाजीला कायम परकं होणार होते. जेव्हा सॅमी आऊट झाला तेव्हा मैदानावर मोठा सन्नाटा होता. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मुंबईकर आणि क्रिकेट आहेत आपल्या सचिनला निरोप द्यायला आले होते. थोड्याफार धावांची भर घालत इंडिजचे पुढील दोन फलंदाज लगेचच बाद झाले. विश्वास बसणार नाही परंतु निम्म्याहून जास्त प्रेक्षक मैदानात रडत होते. मैदानावर भारत जिंकूनही मोठा सन्नाटा होता. एवढ्या मोठ्या फलंदाजाला निरोप यापूर्वी असा निरोप कुणी दिला नव्हता. द्रविडची ती संधी हुकली होती. परंतु तोच द्रविड सचिनच्या निवृत्तीच्या ह्या सामन्यात समालोचक होता तर सचिनचा एकवेळचा कर्णधार आणि सलामीचा दादा फलंदाज सौरव गांगुलीही समालोचकाचीच जबाबदारी पार पाडत होता.

1471856 595930157109374 880833758 n 300x225 - सचिनचा २००वा कसोटी सामना आणि मी...

 

सचिन जेव्हा पुन्हा पाठीमागे वळून मैदानाच्या आणि खेळपट्टीचा पाया पडला तो मोठा भावुक क्षण अंगावर काटे आणणारा होता. त्यानंतर सचिनने लिहून आणलेलं मोठं भाषण कसतरी तो प्रेक्षकांसमोर बोलला. जीवनात ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांचे आभार मानले. मुंबई हे एक वेगवान शहर आहे आणि ते दोन लोकांसाठीच आजपर्यंत थांबलेलं आहे असं ऐकलय. एक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी तर दुसरं मास्टर ब्लास्टर सचिनसाठी. आणि माझं खरंच भाग्य होत कि मला त्या दुसऱ्या क्षणांचा आनंद घेता आला.

1466047 595931263775930 942865035 n 225x300 - सचिनचा २००वा कसोटी सामना आणि मी...

 

तेव्हा मी पत्रकारिता क्षेत्रात आलो नव्हतो किंवा मला याबद्दल जास्त माहितीही नव्हती. मी जेव्हा पहिल्या दिवशी ४:३०ला सामना संपल्यावर ५:१५ वाजता सीएसटी स्थानकानावर पोहचलो तर विश्वास बसणार नाही परंतु मिड डे, मुंबई मिरर, महाराष्ट्र टाइम्स यांनी फुकट सचिनवर स्पेशिअल एडिशन काढून चाहत्यांना वाटली होती. ४५ मिनिटात एखादा पेपर अगदी शेवटच्या चेंडूवर काय झालं हे छापून ते लोकांपर्यंत कस पोहचवू शकतो याच मोठं नवल मला वाटल. तेव्हा मुंबईच्या बऱ्याचश्या रस्त्यांवर सचिनवर बनवलेली विशेष मासिके पाहायला मिळाली. सेंट्रल रेल्वेच्या कामगार युनियनने तर सचिनला शुभेच्छा देणारा मोठा फ्लेक्स सीएसटी स्थानकावर लावला होता.

1425687 595931177109272 1676224884 n 225x300 - सचिनचा २००वा कसोटी सामना आणि मी...

 

सामना संपल्यावर आम्ही तिघे मित्र जेव्हा गाडीतून सी-लिंक रोडवरून जात होतो तेव्हा लक्षात आले की आम्ही गेले ३ तास एकमेकांशी एक शब्दही बोललो नव्हतो. अंदाजे दुपारी २ वाजता सी-लिंक वर असतानाच एफएमवर एक बातमी सांगितली गेली कि सचिन रमेश तेंडुलकर यांना केंद्र सरकारकडून भारतरत्न घोषित झाला. त्याचबरोबर सचिन एका जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाच्या दुसऱ्या इंनिंगची सुरुवात करत होता. अथांग अरबी समुद्राकडे पाहून आम्हीही आपल्या जीवनातील नवीन स्वप्नाच्या वाटा चाचपडत होतो.

1456669 595931387109251 1774784986 n 225x300 - सचिनचा २००वा कसोटी सामना आणि मी...

 

लेखक- शरद डी. बोदगे
(sharad1709@gmail.com)

(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही)

Comments
Loading...
%d bloggers like this: