अर्जुन तेंडुलकरची ऑस्ट्रेलियामध्ये तडाखेबंद कामगिरी

मुंबईकर अर्जुन तेंडुलकरने स्पिरिट ऑफ क्रिकेट चॅलेंज स्पर्धेत काल जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली. त्याने ब्रॅडमन ओव्हल ग्राउंडवर क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून खेळताना हाँग काँग क्रिकेट क्लबविरुद्ध २७ चेंडूत ४८ धावा केल्या तसेच गोलंदाजी करताना ४ विकेट्सही घेतल्या.

ही स्पर्धा सिडनी क्रिकेट ग्राउंडने आयोजित केली आहे. अर्जुन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा असून मुंबईच्या संघात विविध वयोगटातून खेळताना दिसला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जरी फलंदाजीमध्ये अनेक विक्रम केले असले तरी अर्जुन डावखुरा वेगवान गोलंदाज आहे तसेच तो डाव्या हाताने फलंदाजी करतो.

“मी जसा मोठा होत आहे तास मी उंच आणि चांगला गोलंदाज बनत आहे. मला बालपणापासून गोलंदाजी करायला आवडते. मला वेगवान गोलंदाज बनायला आवडेल कारण भारतात खूप कमी वेगवान गोलंदाज आहेत. ” असे अर्जुन abc.net.au शी बोलताना म्हणाला.

मला ह्या मैदानावर खेळायला मिळणे हे मी भाग्य समजतो.” अर्जुन पुढे म्हणाला. 

काय आहे ब्रॅडमन ओव्हल:
सर डॉन ब्रॅडमन हे ज्या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये वाढले आणि त्यांनी आपली कारकीर्द घडवली ते हे मैदान आहे. ऑस्ट्रेलिया फिरायला जाणाऱ्या पर्यटकांचा हा आवडता अड्डा आहे. येथे दोन ब्रॅडमन म्युझियम आहे. हे सिडनीपासून ९० मिनिटांच्या अंतरावर आहे. हे मैदान प्रथम श्रेणी दर्जाचे आहे. ICC International Hall of Fame येथेच जवळपास आहे.