सचिन विरुद्ध ऑस्ट्रेलिया…

मागच्या दशकातला ऑस्ट्रेलिया एक अपराजित संघ. ऑस्ट्रेलियाला जर का हरवायचे असेंल तर जीवाचे रान करावे लागायचे आणि त्यातही शाश्वती नसायची की आपण शेवटी आपण जिंकू की नाही. ऑस्ट्रेलिया एक संघ नसून ती एक जिंकण्याची मानसिकता होती. विरोधी संघाच्या आव्हानातील हवा कशी काढायची हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. हेडन, गिलख्रिस्ट, बेव्हन, मार्क वॉ, गिलेस्पी, सायमंड्स यांना पाहून धडकी भरायची. त्यात भर म्हणून की काय तो चतुर, धूर्त कर्णधार रिकीं पॉन्टिंग. रिकी पॉन्टिंग नक्कीच शकुनीचा आधुनिक अवतार असणार इतका चालाक आणि त्याचे दोन हुकूमी एक्के होते वॉर्न आणि मॅग्राथ. हे सर्व मिळून बनायची ती ऑस्ट्रेलियन टीम.

त्यांच्या समोर असायचा तो एक टिपिकल मुंबईकर, भारताचा वंडर बॉय सचिन, नाम तो सूना ही होगा… नाव -: सचिन तेंडुलकर, पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर, इंडिया. तो एकटा ऑस्ट्रेलियन टीमची जितकी धुलाई करायचा तितकी अग्निपथमध्ये शेवटी ह्रितिक कांचाची पण करत नाही. माणूस शूर बनतो तो त्याच्या आत्मविश्वासाने, बिकट परिस्थितीला सामोरे जाण्याच्या ध्येर्याने. सचिन वि. ऑस्ट्रेलिया एक युद्ध असायचे. वन फॉर ऑल स्थिती सचिनने बनवली होती. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक अस्त्राचे उत्तर सचिनची बॅट होती.

जितके आव्हान मोठे तितका विजय मोठा. परिणामी जो विजयाचा शिल्पकार तो मोठा. सचिनच्या बॅटने कांगारूंविरुद्ध खूप धावा केल्या आणि कित्येकदा त्यांना पराभवाची चव चाखायला लावली. पराभवाची चव त्यांना पचनी पडायची नाही तेव्हा तेव्हा हेच ऑस्ट्रेलियन खेळताना काहीही टिप्पणी करायचे पण सचिनचे लक्ष अर्जुनासारखे माश्याच्या डोळ्यावर म्हणजे विजयावर असायचे. सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच सर्वाधिक रन्स काढले.

रोबोची अचूकता असणाऱ्या मॅग्राथच्या चेंडूंना त्याने पुढे सरसावत अलगद मैदना बाहेर  भिरकावलेले. आपण हेही पाहिले आहे तर जादुई फिरकी गोलंदाज वॉर्नची जादूही त्याने संपवून टाकली. वॉर्नची गोलंदाजी ही एखाद्या महान चित्रकाराने कुंचला हातात घ्यावा आणि दोन एक फ़टकारात एक अप्रतिम लोभस चित्र रेखाटावे अशी होती खरी, पण सचिन समोर ती थोटकी वाटायची इतके वैविध्यपूर्ण फटके सचिन मारायचा की ते पाहणे म्हणजे पर्वणी असायची.

सचिनने कांगारूंविरुद्ध सर्व प्रकारात मिळून १४४ डावात खेळताना ६७०७ धावांचा डोंगर उभा केला. त्याने ४९च्या सरासरीने धावा बनवत २० शतके तर ठोकलीच सोबत ३१ अर्धशतकेही ठोकली. कसोटी क्रिकेटमध्ये ३९ सामन्यात ७४ डावात फलंदाजी करताना सचिनने ५५च्या सरासरीने  ३६३० धाव केल्या ज्यात त्याने ११ शतके आणि १६ अर्धशतके ठोकली. एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनची कामगिरी तर कसोटी पेक्षाही जबदस्त होती. सचिनने ७१ सामन्यात ७० डावात खेळताना ४४.५९ च्या सरासरीने ३०७७ धावा बनविल्या त्यात ९ मोठी शतके आणि १५ अर्धशतके आहेत ज्यात त्याचा सर्वाधिक स्कोर हा १७५ धावांचा आहे.

घरच्या मैदानावर खेळताना सचिनने कांगारून विरुद्ध क्रिकेटच्या दोनही प्रकारात खेळताना ४९ सामन्यात ६६ डावात खेळताना ५४.५४ च्या सरासरीने ३३८२ धावा केल्या त्यात सचिनने ९ शतके आणि १८ अर्धशतके ठोकली. २१६ हा त्यामधला सर्वाधिक स्कोर होता. सचिनने ऑस्ट्रेलियात जाऊनही त्यांची धुलाई केली. सचिनने ऑस्ट्रेलियात खेळलेल्या ४५ सामन्यात ६३ डावात फलंदाजी करताना ४३.९४ च्या सरासरीने २५४९ धावा बनविल्या. त्यात स्टिव्ह वॉच्या अखेरच्याच्या कसोटी सामन्यातील २४१ नाबाद धावा  हा सचिनचा तेथील सर्वोत्तम आहे तर त्यात सचिनने ९ शतके आणि १८ अर्धशतके ठोकली. २००७-०८ च्या व्ही. बी. सिरीजच्या अंतिम सामन्यात ठोकलेले शतक ही आहे आणि दुसऱ्या सामन्यात केलेल्या ९१ धावा ही आहेत. त्यावेळेस भारताने प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशात जाऊन हरवून एकदिवसीय मालिका जिंकली होती.

सचिनने तटस्थ ठिकाणीही कांगारुंची चांगलीच खातीरदारी केली. त्याने तटस्थ ठिकाणी खेळलेल्या १६ सामन्यात १५ डावात फलंदाजी करताना ५१.७३च्या सरासरीने आणि ९५च्या स्ट्राइक रेटने ७७६ धावा त्यात ४ शतके आणि १ अर्धशतक आहे. यात त्याने शारजा मध्ये केलेल्या दोन शतकीय खेळींचा सामावेश आहे. सचिन ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना लोक भान हरवून सचिनची फलंदाजी पाहायचे.

ऑस्ट्रेलियन खेळाडू कधी कोणाची जास्त स्तुती करत नाहीत पण त्यांनी सचिनची महानता कित्येकदा मान्य केली. त्याच्या फलंदाजीच्या भीतीने कित्येकदा झोप आली नसल्याची कबुली वॉर्न देतो तर महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनची वाहवाह करताना त्यांना त्यात स्वतः  फलंदाजी करत असल्यासारखे वाटले.

 

लेखक- राजकुमार ढगे
( टीम महा स्पोर्ट्स )

(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही)