सचिनाख्यान भाग- १

तो एकोणसीव्या शतकाचा शेवटचा कालखंड होता.संपुर्ण भारत मुलूख परकीय आक्रमकांद्वारे,विदेशी वेगवान गोलंदाज सरदारांच्या वेगवान गोलास्त्रामुळे..फिरकी मायावी अस्त्रामुळे भरडला जात होता.भारतीय मुलूखातील जनता असुरक्षेच्या,अपयशाच्या दहशतीत दिवस कुंठीत होती.भारतीय चेंडुफळी चे देउळे,राऊळे युद्धातील अपयशामुळे उध्वस्त होत होती.

आशेचा किरण ‘सनी’ सूर्यही मावळला होता.अनेक वर्ष दुभती ‘कपिला’ गायही आता वृद्ध झाल्या कारणाने आता पुर्वीसारखी प्रसवत नव्हती.

किरमाणी गेल्याने मागे राहिलेल्या किर्र काळोखात शास्त्री आणि मोरे हे मराठा सरदार अधुन मधुन काजव्या प्रमाणे चमकायचे.

वासरांच्या कळपात फार थोड्या लंगड्या गायीच शिल्लक होत्या.

एकंदर संपुर्ण मुलुख युरोपीयन गोरे,आफ्रीका खंडातील काळे धिप्पाड दैत्यरूपी वाॅल्श,अँम्ब्रोस सरदार,वायव्येकडील कृर द्वेषी अक्रम,खान हे यवन सरदार
दूर सागरातील आॅस्ट्रेलिया बेटावरील लिली..इ परकीय वेगवान आक्रमणांमुळे भरडुून निघत होता.

त्या अपयशाच्या दहशतीच्या काळोखाला नष्ट करणे आता कोण्या देवालाच मानवी अवतार घेउन आल्यावरच शक्य होते.

”यदा यदा ही धर्मस्य
ग्लानिर्भवतु भारत…. ”

ह्या वचनाची आठवण होउन सामान्य प्रजा ईश्वराचा धावा करू लागलीत!
”त्राही माम्! त्राही माम्”

संत देवीला आळवु लागलेत.
”दार उघड बये दार उघड…”
हे दुर्गे..
हे महिषासुरमर्दिनी.. दार उघड!!

हे सप्तश्रृंग निवासिनी!!
दृष्टांचा संहार होण्यासाठी..स्वराज्य स्थापन होण्यासाठी दार उघड!!

आणि बयेनं दार उघडलं!

1973 सालचा वसंत ऋतु नुकताच संपला होता..ग्रिष्मास सुरवात होत होती..आकाशातील रवी आपलं तेज प्रचंड वाढवत होता..धरणी तप्त झाली होती..वायु उष्ण होते..

आणि 24 एप्रील चा तो सुदीन उजाडला!प्रात:काळापासुनच शुभ शकुन मिळत होते.
आणि
तिन्ही बाजुने सागराने वेढलेल्या मुंबापुरी परगण्यात दादर इलाख्यात श्री रमेश आणि रजनी तेंडुलकर या मराठी कुटुंबात एका दिव्य बाळाचा जन्म झाला!

पिताश्री रमेश तेंडुलकरांनी;तत्कालीन महान विख्यात संगीतकार,राजगायक श्री सचिन देव बर्मन यांच्या नावावरून आपल्या बाळाचे ‘सचिन’ हे नामकरण केले.

”सचिन जन्मला गं सखे सचिन जन्मला..”घरतील स्त्रिया हर्षोन्मादाने गाउ लागल्या!

अत्यंत आनंदात दिवस भरभर जात होते. कुरळे जावळे असलेला बाल सचिन आता रांगायला लागला होता.

एक दिवस घरची मंडळी आपापल्या कामात बाहेर व्यस्त होती.दिवाणखाण्यातील जमीनीवर बाल सचिन रांगत होता.आणि..त्याक्षणी बाल सचिनचे लक्ष समोरील कोनाड्यात उभे ठेवलेल्या शस्त्राकडे गेले!!!!!

बाल सचिन रांगत कुतुहलापोटी त्या विलक्षण शस्त्राकडे रांगत गेले.

ते जेष्ठ बंधुंचे ‘फळी शस्त्र’ होते.आंग्ल भाषेत त्या शस्त्राला ‘बॅट’ असे म्हणत!!

बाल सचिनने त्या शस्त्राला स्पर्श केला!

त्याक्षणी विजा कडाडु लागल्यात..वायु वेगाने वाहु लागला!
धरणी क्षणभर थरथरली!

आणि बाल सचिनला स्मरण झाले आपण कोण आहोत आपला जन्म कशासाठी झाला आहे!
आतापर्यंत कोहम् कोहम् म्हणणारा सचिन आता सोहम् सोहम् म्हणु लागला!

स्वर्गस्थ यक्षादि देवगण ते दृश्य आकाशातुन आनंदाने पाहु लागले…

शुक्ल पक्षातील बालइंदु.. चंद्रकोरीप्रमाणे बाल सचिनही आता मोठे होत होते.

”ज्येष्ठ तुज्ञा पुत्र मला देई दशरथा..”हे त्रेतायुगातील दैत्यांचा वध करण्यासाठी दशरथाला म्हणणाऱ्या विश्वामित्रांप्रमाणे; एक दिवस श्री रमाकांत आचरेकर हे तत्कालीन चेंडु फळी विद्येचे,युद्धशास्त्राचे महान गुरूवर्य श्री रमेश तेंडुलकरांना म्हणु लागले ”कनिष्ठ तुझा पुत्र मला देइ तेंडुलकरा.. ”

अशा प्रकारे बाल सचिनच्या जीवनातील एका अत्यंत महत्वाच्या पर्वास प्रारंभ झाला.
बाल सचिनचा रमाकांत आचरेकरांच्या शिवाजी पार्कातील गुरूकुलात प्रवेश झाला.

बाल सचिन दररोज करड्या शिस्तेच्या आचरेकर गुरूंकडुन युद्धाचे प्रशिक्षण घेउ लागला.
दररोज पहाटे उठणे,दौड मारणे व्यायाम करणे आणि फळी शस्त्र चालवणे हाच दिनक्रम होता.

एका यष्टीवर एक राजमुद्रा ठेउन युद्धशास्त्र..फळी अस्त्र शस्त्र स्व संरक्षण,आक्रमण..आंग्ल भाषेप्रमाणे हुक.पुल.कवर,स्ट्रेट ड्राइव्ह,स्केअर कट इत्यादी अस्त्र शस्त्र विद्या शिकु लागला.

फक्त फळी शस्त्रच नाही तर अचुक वेध घेणारे मायावी फिरकी,वेगवान गोलास्त्र टाकणे ही शिकला.

प्रशिक्षणाची काही वर्षे गेलीत.हळुहळु बाल सचिन आता कुमार सचिन झाला होता.कुरळे केसांचा नाजुक कोवळी लव असलेला मिसरूड फुटलेला कमी शारिरीक उंची असलेला,कोमल स्वरांचा सचिन आता कुमार झाला होता.

मैदानी युद्धातील क्षेत्ररक्षण,फलंदाजी,गोलंदाजी सर्व विद्या आत्मसात केली होती.

त्याच काळात आपल्या ‘विनोदवीर’ मित्रासोबत मिळुन इतर गुरूकुलीन युद्ध स्पर्धेत एक जागतिक विक्रमही केला होता.

दुसरीकडे त्याच काळात देशाची सैन्य भरती सुरू होती.

आणि सचिनची सैन्यात निवड झाली.इतक्या लहान वयात सिमेवर देशासाठी खेळायला मिळणे हे कुमार सचिन आणि देशाचंही नशीब होतं.

सचिन युद्धासाठी जाण्यास सज्ज झाला.माता रजनीने निरांजनाने पुत्राचे औक्षण केले.

युद्ध वायव्येकडील पाकिस्थानात यवनांशी होणार होते.पाकीस्थानात विरूद्ध बाजुने इमरान खान,वसीम अक्रम,वकार युनूस नावाचे कृर वेगवान आक्रमक योद्धे होते.

कुमार सचिनकडे बघुन ते हसु लागले ”ये तो बच्चा है अभी!
यह बच्चा क्या टीकेगा हमारे सामनेे!” अशी निर्भत्सना करू लागले.

सियालकोट या कुरूक्षेत्रावर चौथे कसोटी युद्ध आरंभले.शंख फुंकले..युद्धाच्या शेवटच्या दिवशी भारत मुलूखाची अवस्था फार बिकट होती.सुरवातीचे ज्येष्ठ रथी महारथी परतले होते.मुलूख वाचवणे ही ‘कसोटी’ होती.आणि योद्ध्याच्या शुभ्र वेषात कुमार सचिन कुरूक्षेत्रावर हातात फळी अस्त्र घेउन,पाय,हाताच्या कोपरांवर चिलखती आवरणे घालुन उतरला.

आपल्या खास नेत्रदिपक उभे राहण्याच्या शैलीत हाती फळी शस्त्र यवन गोलंदाजासमोर घेउन उभा ठाकला!

पुन्हा युद्धास प्रारंभ झाला..सचिन च्या अंगावर वेगवान खान,अक्रम,युनुस सरदार गोलास्त्राचा तिव्र मारा करू लागले.कुमार सचिन ते आपला फळीवर तर कित्येक वेळा अंगावर झेलू लागला..

पण..एका क्षणी वकार युनुस या वेगवान योद्ध्याचा आपटुन टाकलेला गोलास्त्र सचिनच्या चेहऱ्यावर नाकावर आदळले!कुमारच्या नाकातुन भळाभळा रक्त निघु लागले..मोठी जखम झाली..समोर सोबतीला पंजाबचा तत्कालीन नवज्योत सिद्धु सरदार उभा होता..त्याने ताबडतोब वैद्यकीय सेवा मागवली..

सचिन मैदानावरच जखमी अवस्थेत होता.वैद्यांनी ताबडतोब उपचारासाठी मैदान सोडण्यास सांगितले.

विरूद्ध पक्षापासुन सिद्धु सरदारापर्यंत सर्वांना कळले की हा कुमार आता मैदान सोडणार..

कुमार शांत राहिला.कुमार सचिनने जल पात्रातुन स्वत: स्वत:ची जखम धुतली..रक्त पुसले…

आणि त्या क्षणी रणांगणावर जे शब्द कुमार बोलला ते ऐकणारा सिद्धु सरदार आणि ते वैद्य हे नशीबवान ठरलेत.

कुमार सचिनच्या डोळ्यात आग होती.तो सरदार आणि वैद्याला मुंबापुरी परगण्यातील भाषा शैलीत इतकच बोलला

”मै खेलेगा !! ”

सर्वजण कुमाराचं ते बोलणं ऐकुन अवाक् झालेत!

पुन्हा युद्धास प्रारंभ झाला..कुमार सचिन त्याच्या खास शैलीत फळी अस्त्र घेउन उभा राहिला..

आणि वकार युनूस नामक वेगवान पाकी सरदाराने टाकलेल्या पुढच्याच गोलास्त्राला कुमार सचीनने सिमापार टोलवला….

त्यानंतर इतिहास घडला..इतिहास घडत राहिले..

16 व्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या साक्षीने आपले रक्त सांडुन स्वराज्याची शपथ घेतली होती.
त्याच प्रकारे 16 व्या वर्षी पापस्थानावरील भुमीवर आपले रक्त सांडुन कुमार सचिनने प्रतिज्ञा केली ” हे स्वर्गस्थ देवादिकांनो,पितरांनो,शक्तींनो मी तेंडुलकर कुलोत्पन्न, रजनीरमेशपुत्र स्वरक्त सांडुन प्रतिज्ञा करतोय जोवर भारतीय मुलुखाचं स्वराज्य स्थापन करणार नाही तोवर युद्धातुन सक्रिय निवृत्ती घेणार नाही!

(बाल कांड समाप्त.)

(क्रमश:)

लेखक- अभिजित पानसे
( फेसबुक- https://www.facebook.com/abhijeet.panse )

(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही)